– वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई वेगात
नागपूर :- नागपूर परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे अद्यापही 70 कोटी 54 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे गेल्या 25 दिवसांमध्ये तब्बल अडीच हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येत असल्याने थकीत वीजबिलांचा ताबडतोब भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
नागपूर परिमंडलांतर्गत असलेल्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे अद्यापही१ 70 कोटी 54 लाखांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणे व खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करण्यासाठी सर्व अधीक्षक अभियंते कार्यकारी अभियंते व इतर अधिकारी, कर्मचारी सध्या ऑन फिल्ड आहेत. नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके परिमंडलात सर्वत्र दौरे करून थकबाकी वसुलीचा आढावा घेत आहेत.
नागपूर शहर मंडलातील वीजग्राहकांकडे 51 कोटी 86 लाख रुपयांची थकबाकी आहे. तर नागपूर ग्रामिण मंडलातील वीज ग्राहकांकडे 11 कोटी 54 लाखांची थकबाकी आहे. याशिवाय वर्धा मंडलातील ग्राहकांकडे 7 कोटी 34 लाखांची थकबाकी आहे. वारंवार विनंती करूनही ग्राहकांनी वीज बिल न भरल्याने महावितरणची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. आर्थिक वर्ष संपायला अगदी मोजकेच दिवस शिल्लक राहिल्याने महावितरणने थकबाकी वसुलीची मोहीम अधिक तीव्र केली आहे. विनंती करूनही वीज बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.
5 हजार रुपयांवरील थकबाकीदारांवर लक्ष
नागपूर परिमंडलात महावितरण पाच हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकीदारांवर लक्ष ठेवून आहे. या महिन्याच्या आतापर्यंत तब्बल अडीच हजार ग्राहकांची वीज कापली गेली आहे, त्यापैकी बहुतांश ग्राहकांडे 5 हजारापेक्षा धिकची थकबाकी होती.
वीजचोरीचा गुन्हा दाखल केला जाईल
थकबाकी वसुलीबरोबरच महावितरणकडून वीजचोरीवरही करडी नजर आहे. यासाठी स्वतंत्र पथक तपास करत आहे. थकबाकीपोटी एखाद्याची वीज पुरवठा खंडित करण्यात आला असेल आणि तो ग्राहक शेजाऱ्याकडून वीज घेत असेल, तर दोघांवरही वीज कायदा कलम 135/138 अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. थकबाकीसोबतच चालू वीज बिलांचा नियमित भरणा करुन सहकार्य करण्याचे आवाहन देखिल महावितरणने केल आहे.