मुंबई :- राज्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागा जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरली आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सर्व जागा जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयाची महाभेट देतील, असा विश्वास भाजपाचे प्रदेश निवडणूक प्रभारी व उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री खा.डॉ. दिनेश शर्मा यांनी मंगळवारी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत शर्मा बोलत होते.भाजपा लोकसभा निवडणूक व्यापस्थापन समितीचे अध्यक्ष आ.श्रीकांत भारतीय, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश प्रवक्ते अतुल शाह, ज्येष्ठ नेते जयप्रकाश ठाकूर, प्रवीण घुगे आदी यावेळी उपस्थित होते.
खा.शर्मा यांनी सांगितले की, यावेळची निवडणूक मोदीमय झालेली आहे. देशातच नव्हे तर जगभरातही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा बोलबाला आहे. राम मंदिर निर्मिती,370 वे कलम रद्द करणे यासारख्या निर्णयांमुळे नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व झळाळून उठले आहे. केंद्र सरकार आणि भाजपा शासित राज्यांच्या सुशासनामुळे जनतेचा भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीवरील विश्वास वाढला आहे. महाराष्ट्रातही नरेंद्र – देवेंद्र या जोडीच्या जादूमुळे मतदार महायुतीला मोठा विजय मिळवून देतील,असे वातावरण आहे.
खा.शर्मा यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला नेहमीच प्रखर विरोध केला. हिंदुत्वाचे कडवे समर्थक असलेल्या बाळासाहेबांना काँग्रेसचे हिंदुविरोधी रूप माहित होते. उद्धव ठाकरे यांनी मात्र मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेसशी हातमिळवणी करत मतदारांचा विश्वासघात केला. या विश्वासघाताला मतदार या निवडणुकीत योग्य उत्तर देतील. मतदारांच्या मध्ये महाविकास आघाडीबद्दल असलेल्या संतापामुळे उबाठा, काँग्रेस आणि शरद पवारांच्या महाविकास आघाडीचा निवडणुकीत धुव्वा उडेल.
हिंदुविरोधी काँग्रेसने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना लोकसभा निवडणुकीत कसे पराभूत केले हा इतिहास महाराष्ट्राला ठाऊक आहे. अशा आंबेडकर विरोधी मंडळींशी उद्धव ठाकरे यांनी आघाडी करावी ही गोष्ट राज्यातील शोषित, वंचित जनतेला आवडली नाही. ही जनता उद्धव ठाकरे, काँग्रेसला निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही खा.शर्मा यांनी नमूद केले.