– दक्षिण, मध्य, पूर्व नागपूरमध्ये निवडणूक कार्यालयांचे उद्घाटन
नागपूर :- जे स्वतःच्या ताकदीवर निवडून येऊ शकत नाहीत, ते जातीपातीचे राजकारण करतात. भाजपने दहा वर्षांत जात-पात बाजूला ठेवून शहरातील लोकांच्या समस्या सोडवल्या. जनसेवेचे, विकासाचे राजकारण केले. रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी काम केले. जे काँग्रेसला साठ वर्षांत जमले नाही, ते आम्ही अवघ्या एका दशकात करून दाखवले. काँग्रेसकडे सांगण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे तुमच्या घरी मत मागायला येणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना साठ वर्षांचा हिशेब मागा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (सोमवार) मतदारांना केले.
ना. गडकरी यांच्या हस्ते दक्षिण, पूर्व व मध्य नागपूर मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन झाले. दक्षिण नागपूर येथे अयोध्या नगर चौकात भाजप आमदार मोहन मते, पूर्व नागपुरातील छापरू नगरमध्ये आमदार कृष्णा खोपडे व मध्य नागपुरातील अयाचित मंदिर चौकात आमदार प्रवीण दटके यांच्या प्रचारार्थ ना.गडकरी यांच्या सभा झाल्या. यावेळी ना. गडकरी यांनी शहरातील विकास कामांचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, ‘नागपूर शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली. आज ७५ टक्के नागपूरकरांना बारा ते चोवीस तास पाणी मिळत आहे.
पूर्व व दक्षिण नागपुरातील अनधिकृत वस्त्यांमध्ये चांगले रस्ते झाले. नवीन ९३ पैकी ८३ जलकुंभ तयार झाले आहेत. मेट्रो रेल्वे आली, काँक्रिटचे रस्ते झाले, देशातील प्रतिष्ठित शिक्षण संस्था आल्या, आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे, रेल्वे स्थानकांचा कायापालट होत आहे. शहरात उड्डाणपूल, अंडरपास झालेत.’ आता नाग नदीच्या प्रकल्पात शहरातील ड्रेनेज सिस्टीम सुधारण्याचेही काम होणार आहे. याचा फायदा पश्चिम, दक्षिण-पश्चिम, दक्षिण, पूर्व आणि मध्य नागपूरला होणार आहे. नाले शुद्ध होतील आणि ड्रेनेजमध्ये पाणी अडकणार नाही, असेही ना.गडकरी म्हणाले.
आता कुठे गेले काँग्रेसवाले?
गेल्यावर्षी अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. लोकांच्या घरात पाणी शिरले. तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी आरोप केला की काँक्रिट रोडमुळे लोकांच्या घरात पाणी शिरले. यावर्षीही जोरदार पाऊस आला. पण पाणी शिरले नाही. काँक्रिट रोड तर आज पण आहेत. आता कुठे गेले काँग्रेसवाले?, असा सवाल करत ‘जे आयुष्यात काम करू शकले नाहीत, ते लोकांकडे बोट दाखवतात,’ अशी टीका ना. गडकरी यांनी केली.
काँग्रेसने वारंवार संविधान बदलले
एनडीएच्या ४०० जागा आल्या तर हे लोक संविधान बदलतील, असा अपप्रचार काँग्रेसने केला. लोकांची दिशाभूल केली. काँग्रेसनेच वारंवार संविधान बदलले. आम्ही कधीही बदलले नाही. त्यामुळे काँग्रेसने खोटे पसरवले तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन ना. गडकरी यांनी केले.
‘मोहन मते यांनी लोकांच्या समस्या सोडवल्या’
आमदार मोहन मते आपल्या कार्याने या क्षेत्रात परिचित आहेत. लोकांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी सोडविण्यात त्यांना यश आले आहे. त्यामुळेच दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे, असे ना. गडकरी म्हणाले. यावेळी माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती, भाजप नेते संजय भेंडे, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृष्णा खोपडेंची ओळख ‘कार्य सम्राट’
गेल्या पंधरा वर्षांमध्ये पूर्व नागपूरचे चित्र बदलले. कृष्णा खोपडे यांना कार्यसम्राट म्हणून लोक ओळखू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळ सर्व वस्त्यांमध्ये फिरलो तेव्हा या भागाचा विकास बघून कृष्णा खोपडेंचे कौतुक केले, असे ना. श्री. गडकरी म्हणाले. यावेळी महायुतीचे उमेदवार कृष्णा खोपडे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार प्रा. अनिल सोले, माजी नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, प्रमोद पेंडके यांची उपस्थिती होती.
‘मध्य नागपुरातील जनता प्रवीण दटकेंसोबत‘
मध्य नागपूर आमच्यासाठी कुटुंब आहे. येथील जनतेने आजपर्यंत भाजपला साथ दिली आणि आता प्रवीण दटके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असा विश्वास ना. गडकरी यांनी व्यक्त केला. यावेळीमहायुतीचे उमेदवार आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, दीपक देवघरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.