नवी मुंबई :- शासकीय कार्यालयांमध्ये दैनंदिन कामकाजात कृत्रिम बुध्दीमतेचा (AI Artificial Intelligence) वापर करुन कमी वेळात उत्तम दर्जाचे काम सोप्या पध्दतीने कसे करावे यासाठी कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून महसूल विभागातील सर्व शाखांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आज कोकण भवनातील पहिल्या मजल्यावरील समिती सभागृहात कृत्रिम बुध्दीमते (AI Artificial Intelligence) विषयी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षणास कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, अपर आयुक्त संजीव पलांडे, नगरपालिका उपायुक्त गणेश शेटे, विजयभूमी विद्यापिठाचे प्राध्यापक डॉ. श्रीकांत पटनाईक, विजयभूमी विद्यापिठ बँगलोर शाखेचे सहायक प्राध्यापक डॉ. अर्पित यादव, सहायक प्रबंधक विजय नायकवडे, महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
हे प्रशिक्षण देण्यासाठी रायगड जिल्हयातील कर्जत तालुक्यातील जामरंग या ठिकाणी असलेल्या विजय भूमी विद्ययापिठाचे कुलपती संजय पडोडे आणि विद्यापिठाच्या कुलगुरु डॉ. अश्विनी शर्मा यांच्या मार्गदर्शनाने कृत्रिम बुध्दीमता (AI Artificial Intelligence) या विषयातील तज्ञ प्राध्यापकांना बोलावण्यात आले होते. जगभरात बदलत्या काळानूसार आधुनिकरण, तंत्रज्ञान, विज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुध्दीमतेचा वापर वाढला आहे. शासकीय कार्यालयांमध्ये ही कामाचा दर्जा वाढविणे, लागणारा वेळ कमी करणे यासाठी कृत्रिम बुध्दीमतेचा वापर व्हावा यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
विजयभूमी विद्यापिठ बँगलोर शाखेचे सहायक प्राध्यापक डॉ. अर्पित यादव यांनी या प्रशिक्षणात माहिती कशी शोधावी, एखाद्या माहितीच्या आधारे पावर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी चॅट जीपीटी, गामा, नॅपकीन सारख्या कृत्रिम बुध्दीमता (AI Artificial Intelligence) टूल्सचा वापर कसा करावा. शासनाच्या प्रभावी योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कृत्रिम बुध्दीमता (AI Artificial Intelligence) टूल्सचा वापर करुन गाणे व्हिडिओ कसे तयार करावे. अशा विविध विषयांच्या कृत्रिम बुध्दीमता (AI Artificial Intelligence) टूल्सचा वापर कसा करावा याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
विजयभूमी विद्यापिठातील विद्यार्थ्यांमार्फत हे कृत्रिम बुध्दीमता (AI Artificial Intelligence) टूल्स तयार केले जातात. कृषि, आरोग्य, शिक्षण अशा महत्त्वाच्या विभागांसाठी उपयुक्त असे AI टुल्स तयार करण्यात येत असून, या टूल्सच्या वापरामुळे समाजात आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञानाचा विकास झपाटयाने होणार आहे. यामुळे शेतकरी, ग्रामीण भागातील जनता यांना मोठयाप्रमाणात फायदा होणार आहे.
यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी या प्रशिक्षाला उपस्थित महसूल विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपण आपल्या कार्यालयातील कामकाज सोपे आणि उत्कृष्ट दर्जाचे होण्यासाठी कृत्रिम बुध्दीमता (AI Artificial Intelligence) टूल्सचा कसा वापर करु शकतो. कोणत्या कामांसाठी या टूल्सची मदत होईल हे सुचविण्याच्या सुचना दिल्या.