‘मनपा’च्या विद्यार्थ्यांचा ‘कला का कारवा’

मुंबई :- फोटोग्राफीचे आकर्षण होत…पण कधी शक्य होईल असे वाटले नव्हते. पण, सलाम बॉम्बे संस्थेने आमच्या शाळेतील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रशिक्षण वर्ग सुरू केले. शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त ज्या मुलांना गायन, नृत्य, अभिनय, मीडिया, फोटोग्राफी यामध्ये रूची असेल अशा मुलांना याचा लाभ मिळाला. आज त्यांच्यामुळे फोटोग्राफी क्षेत्रात करियर करू शकत असल्याचे अंधेरीच्या विद्याविकास शाळेतील माजी विद्यार्थी कुशल महाले याने सांगितले. आज तो फोटोग्राफीचा व्यवसायही करतो आणि महानगरपालिकेच्या शाळेतील मुलांना प्रशिक्षणही देतो.

सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्यावतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ‘कला का कारवा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भुषण गगराणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष राजश्री कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिना रामचंद्रन, कादंबरी कदम, सहायक व्यवस्थापक दिपक पाटील, ह्दयगंधा मिस्त्री उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमध्ये अपार क्षमता आहेत. सलाम बॉम्बे फाउंडेशनसारख्या संस्था या‍ विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देतात आणि योग्य संधी मिळाल्यास हे विद्यार्थी पारंपरिक शिक्षणाच्या पुढे जाऊन विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात असे आयुक्त गगराणी यांनी यावेळी सांगितले.

सलाम बॉम्बे फाऊंडेशन मुंबईतील महानगरपालिका आणि शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या कलांना वाव मिळण्यासाठी तांत्रिक आणि शास्त्रीय प्रशिक्षण देते. कला अकॅडमीमार्फत चित्रकला, नृत्य, नाट्य आणि माध्यम कौशल्ये शिकवली जातात. ‘कला का कारवा’ या कार्यक्रमामार्फत विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. मुंबईतील शाळांतील मुलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

‘कला का कारवा’ कार्यक्रमात शास्त्रीय नृत्य, नाटिका, राजस्थानचे घुमर, गुजरातचे भवई लोकनृत्य, महाराष्ट्राचे कोळी नृत्य, छत्तीसगढचे मोरपंखी, महाराष्ट्राचे लोकनाट्य, महिलांच्या हक्क आणि अधिकारावर भाष्य करणारे संवाद, अध्यात्म, सामाजिक, राजकीय विषयावर भाष्य करणारे नाटक यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केले. अंशु मिश्रा, कामिनी विश्वकर्मा या मुलींनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने मासिकाचे प्रकाशन केले. मासिक कसे असावे, त्याचे विषय, लेखन, छपाई याबद्दल हे काम करत असताना माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तर साधना महाविद्यालयाच्या मयुर इंगळे यांनी विद्यार्थ्यांच्या सहायाने लोककलाकार वासुदेव या विषयावर डॉक्युमेंट्री बनवली. मीडिया क्षेत्रात विद्यार्थ्यांना भविष्यात करियर करता यावे यासाठी त्यांना टीव्ही, प्रिंट, वेब, अशा विविध माध्यमांचे प्रशिक्षण देण्यात येते. या आर्ट अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करियरचा मार्ग सापडतो त्यांना प्लेसमेंट मिळावी यासाठीही प्रयत्न करण्यात येतात, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महाराष्ट्र शासनाचे १४ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

Fri Feb 21 , 2025
मुंबई :- महाराष्ट्र शासनाच्या १४ वर्षे मुदतीच्या १,००० कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!