– रेल्वेच्या तिकीट केंद्रातील घटना
– लोहमार्ग पोलिसांची कारवाई
नागपूर :-गुंगीचे औषधी देवून प्रवाशाला लुटणार्या आरोपीस लोहमार्ग पोलिसांनी पकडले. मागील एक वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे सापळा रचून अटक केली आहे. रमेशकुमार रामभारती (41), रा. चंदोला, उत्तरप्रदेश असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
मंडला येथील रहिवासी फिर्यादी रामेश्वर वर्मे (20) कामानिमीत्त नागपुरात आला. त्याला कोयबत्तूरला जायचे होते. त्याने नागपूर रेल्वे स्थानकाच्या तिकीट केंद्रातून तिकीट घेतली. दुसर्या दिवशी म्हणजे 29 सप्टेंबरला गाडी असल्याने तो केंद्रातच थांबला. आरोपी रमेशकुमार याने फिर्यादीशी ओळख केली. सायंकाळ होताच फिर्यादीच्या शेजारी तो झोपला. सकाळी फिर्यादीला चहा बिस्किट दिले. चहातून त्याने गुंगीचे औषधी दिले. चहा पिताच फिर्यादी बेशुध्द झाला. आरोपीने त्याच्या खिशातील मोबाईल, पर्स आणि 800 रुपये चोरून पळाला. फिर्यादी शुध्दीवर आला तेव्हा बराच उशिर झाला होता.
फिर्यादीने लोहमार्ग पोलिस ठाणे गाठून पोलिसांना सारा प्रकार सांगितला. पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करून औषधोपचार केला. आरोपी विरूध्द गुन्हा नोंदविल्यानंतर त्याचा शोध सुरू केला. स्टेशन परिसरतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपीची ओळख पटली. मात्र, त्याच्या बध्दल काहीच माहिती नव्हती. दरम्यान आरोपीने चोरीचा मोबाईल एका व्यक्तीला विकला. पोलिस तांत्रिक तपासाच्या आधारे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले. त्याने आरोपीचा पत्ता सांगितला. मात्र, आरोपी सांगितलेल्या पत्त्यावर कधीच मिळत नव्हता. पोलिसांनी सखोल तपास केला असता तो सराईत गुन्हेगार असून पैसे संपले की चोरी करतो. पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांच्या मार्गदर्शना हवालदार पुष्पराज मिश्रा, अमोल हिंगणे, प्रवीण खवसे, अमित त्रिवेदी यांनी चंदोला येथे सापळा रचला आणि आरोपी येताच त्याच्या मुसक्या आवळल्या.