– दिग्रस येथे राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत ६०० खेळाडूंचा सहभाग
यवतमाळ :- अतिप्राचीन क्रीडा व कला प्रकार म्हणून परिचित असलेल्या धनुर्विद्यचा नियमित सराव व खेळामुळे खेळाडूंना एकाग्रता, संयम आणि ध्येय साध्य होण्यास मदत होते, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. दिग्रस येथील तालुका क्रीडा संकुलात पार पडलेल्या तीन दिवसीय २१ व्या ज्युनिअर राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन, यवतमाळ जिल्हा आर्चरी असोसिएशन व दिग्रस येथील लक्षवेध धनुर्विद्या क्रीडा अकादमी, यांच्या संयुक्त विद्यमाने २१ वी ज्युनियर राज्यस्तरीय धनुर्विद्या तीन दिवसीय स्पर्धा येथील क्रीडासंकुलात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रतील ३६ जिल्ह्यांतील ६०० च्यावर खेळाडू सहभागी झाले. यावेळी बोलताना ना. संजय राठोड म्हणाले, दिग्रस येथील क्रीडा संकुल क्रीडा क्षेत्राचे नाव भारतभर पोहाचवेल, अशी या संकुलाची निर्मिती करण्यात आली आहे. कबड्डीचे माहेरघर असलेल्या दिग्रसच्या क्रीडा संकुलात पहिल्यांदाच राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा होत आहे. यामुळे दिग्रसला आणखी एक नवीन ओळख मिळेल. धनुर्विद्या (आर्चरी) हा प्राचीन क्रीडा प्रकार एकाग्रता, अचूकता आणि शिस्त शिकवतो. धनुर्विद्या शरीराला मजबूत बनविण्यासोबतच मानसिक एकाग्रता, आत्मनियंत्रण, संयम, मन:शांतीसोबतच ध्येय साध्य करण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असल्याचे संजय राठोड म्हणाले. यावेळी धनुष्यबाणावर तीर खेचून निशाणा लावताना मंत्री संजय राठोड यांनी टार्गेटवर नेम साधला. तेव्हा इतरत्र निशाणा लागो की नाही, मात्र जनतेच्या आशीर्वादाने विधानसभेचा निशाणा अचूक लागला, अशी कोपरखळी त्यांनी केली. त्याला उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. यावेळी धनुर्विद्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी पाच लाख रूपयांचा निधी दिला.
या कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर, तहसीलदार मयूर राऊत, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजकुमार वानखडे, तालुका प्रमुख उत्तम ठवकर, शहर प्रमुख डॉ. संदीप दुधे, राहुल शिंदे, संजीव चोपडे, प्रा. प्रेम राठोड, संतोष झाडे, श्रीचंद राठोड, सुरेश शर्मा यांच्या सह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संचलन अमीन चव्हाण यांनी केले, तर आभार सुरेंद्र राठोड यांनी मानले.