नागपूर :- पात्र नागरिकांना पारदर्शक, कार्यक्षम व समायोचित लोकसेवा मिळावी, यासाठी राज्य शासनाने 28 एप्रिल 2015 रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलात आणला आहे. त्यानुसार शासनाच्या विविध विभागांमार्फत 486 सेवा अधिसूचित करण्यात आल्या असून सद्यस्थितीत 403 सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर, मोबाईल अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरुपात पुरविण्यात येत आहेत. या सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन नागपूर विभागाचे लोकसेवा हक्क आयुक्त अभय यावलकर यांनी केले आहे.
‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आला असून शासकीय विभागामार्फत उपलब्ध होणाऱ्या सेवा प्राप्त करण्यासाठी नागरिकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन अभय यावलकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई येथील मुख्य आयुक्त कार्यालय आणि प्रत्येक महसुली विभागासाठी आयुक्त कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. नागपुरातील रविभवन येथील कुटीर क्रमांक 1, सिव्हील लाईन्स येथे लोकसेवा हक्क आयुक्तांचे कार्यालय कार्यान्वित असून, या आयोगाच्या कार्यक्षेत्रात नागपूर, वर्धा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया तसेच भंडारा जिल्हे समाविष्ट आहेत.
नागरिकांना विहीत वेळेत सेवा न मिळाल्यास त्याबाबत प्रथम व व्दितीय अपिल त्या विभागाच्या पदनिर्देशित अपिलिय अधिका-यांकडे करता येते. त्यानंतरही सेवा उपलब्ध न झाल्यास तृतीय अपिल आयुक्त, राज्य लोकसेवा हक्क आयोग, नागपूर यांच्याकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन (crtsnagpur@maharashtra.gov.in / crts.nagpur@gmail.com / 0712- 2996605) पध्दतीने करता येईल. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम संबंधी लोकांच्या मनामध्ये उपस्थित होणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरे ‘आपले सरकार’ पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत.