– ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थ दर्शन यात्रेची संधी : झोन कार्यालयात अर्ज उपलब्ध
नागपूर :- महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील ६० वर्षे व त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत नागपूर शहरातील ६० वर्षे व त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थस्थळांच्या दर्शनाची संधी मिळणार आहे. इच्छूक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या संबंधित झोन कार्यालयात संपर्क साधून अर्ज भरुन घ्यावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ अंतर्गंत मनपाद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. योजनेकरिता ऑफलाईन माध्यमातून अर्ज करण्याची देखील सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना अर्जासोबत आधार कार्ड/ रेशनकार्ड तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र / महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला यामध्ये लाभार्थ्यांचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्यांचे १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र/ प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल. यासोबतच सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा २.५० लाखापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे अथवा केशरी रेशनकार्ड तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक, योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र ही सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे, अशी माहिती मनपाच्या समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी दिली आहे.
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ करिता मनपाच्या दहाही झोन कार्यालयामध्ये अर्ज प्राप्त करणे तसेच ऑनलाईन माध्यमातून भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. नागपूर शहर क्षेत्रातील ६० वर्षे तसेच त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज भरण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.