यवतमाळ :- डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, कृषि विभाग व आत्माच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती निमित्य राज्यस्तरीय कृषि प्रदर्शनीचे आयोजन दिनांक २७ ते २९ डिसेंबर दरम्यान अकोला येथे विद्यापीठाच्या किडांगणात आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रदर्शनीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तिनही दिवस कृषि प्रदर्शनी सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनीत फळबाग, भाजीपाला, फुलशेती, वनौषधी, कापूस, ज्वारी, गहू, कडधान्य, तेलबिया, पाणलोट विकास, ऊस, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, कृषि अभियांत्रिकी ईत्यादी विभागाची दालने तसेच ईतर संलग्न संस्थासह, कृषि निविष्ठा व कृषि औजारे यांची दालने सुध्दा राहणार आहे. तसेच शास्त्रज्ञ शेतकरी सुसंवाद, प्रगतीशील शेतकऱ्यांचे मनोगत व मान्यवरांचे संबोधनाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रदर्शनीतील कृषि पुरक व्यवसाय दालने, कृषि प्रक्रिया उद्योगातील दालने शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी तसेच मनोबल उंचाविणारे ठरणार आहे. याशिवाय गट शेती, करार शेती, स्वयं सहायता बचतगटांच्या यशोगाथा, महिलाबचत गटांनी उत्पादित केलेले कृषि आधारीत उत्पादने, शेतकऱ्यांनी तयार केलेली नाविन्यपूर्ण शेती अवजारे आदी दालने सुध्दा राहणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापिठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ.धनराज उंदिरवाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सुरेश नेमाडे यांनी केले आहे.