यवतमाळ :- आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच खा. संजय देशमुख म्हणाले की, महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम केले तर, अपनेभी अच्छे दिन आयेंगे. सातही विधानसभेत आघाडीचेच आमदार निवडून येतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. पुस्तक प्रकाशन सोहळ्यावर बोलताना ते म्हणाले की, माणिकरावांचा कार्यकाळ संयमी राहीला. सर्वांना न्याय देण्यासाठी ते प्रामाणिक प्रयत्नरत राहिले. मात्र सर्वांना न्याय देता येत नाही. त्यात मीही होतो अशी गुगली त्यांनी टाकली. काम करताना कुणाचा अपमान होईल असे शब्द त्यांच्या तोंडून कधी निघत नाही. 20 वर्षांपासून त्यांचे राजकारण मी बघतो आहे. संयमी वृत्तीमुळेच त्यांना देशात नेतृत्व करण्याची संधी मिळाली. यवतमाळच्या इतिहासात त्यांच्याएवढी पदे कुणाला मिळाली नसेल. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी चांगले काम केले. कोणत्याही प्रसंगात त्यांनी पक्षाची साथ सोडली नाही. तसेच दिग्रस, दारव्हा, नेरमध्ये त्यांनी जातधर्माचे राजकारण कधीच केले नाही, असेही देशमुख म्हणाले. छत्रपती शिवरायांचा हवेने पुतळा पडल्याचे सांगितले जाते. मात्र सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार सर्वत्र उघडा पडतो आहे, असा आरोपही त्यांनी केला. सोयाबिनला केवळ 3400 रुपये भाव असल्याने सहा हजार भाव मिळण्यासाठी लवकरच जिल्हा कचेरीवर मोठे जनआंदोलन आघाडी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.