– केतकर, सप्तर्षी, द्वादशीवार, पोहरे, पवार, खाडिलकर, चव्हाण पुरस्कारांचे मानकरी
– शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते दिला जाणार पुरस्कार
मुंबई :- देशभरात नावारूपाला येत ३७ हजार पत्रकार पदाधिकारी सदस्य असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ जीवन गौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय आवटे, राष्ट्रीय उपाध्यक्ष मंदार फणसे, धर्मेंद्र जोरे यांनी या पुरस्कारांची घोषणा आज केली. ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन येत्या 18 व 19 नोव्हेंबरला बारामती येथील गदिमा सभागृहात पार पडणार आहे. या अधिवेशनात राज्यातल्या, देशातल्या पत्रकारितेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सात ज्येष्ठ संपादकांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
कुमार केतकर (ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत), कुमार सप्तर्षी (ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत, लेखक), सुरेश द्वादशीवार (संपादक- लोकमत, विचारवंत), प्रकाश पोहरे (मुख्य संपादक- देशोन्नती, विचारवंत, लेखक), श्रीराम पवार (ज्येष्ठ संपादक, विचारवंत, लेखक), जयश्री खाडिलकर (मुख्य संपादक- नवाकाळ, विचारवंत), आदिनाथ चव्हाण (संचालक संपादक- अग्रोवन, विचारवंत) यांना ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत या सात संपादकांना सन्मानित केले जाणार आहे. या सातही मान्यवर मंडळींची संजय आवटे हे प्रगट मुलाखत घेणार आहेत. या अधिवेशनात पुरस्कार आणि मार्गदर्शन हे सत्र सर्वांच्या आकर्षणाचा विषय असणार आहे, अशी माहिती ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे राज्य अध्यक्ष अनिल म्हस्के, बारामती अधिवेशन संयोजक तथा ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे राज्य उपाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ, बारामती ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे अध्यक्ष जितेंद्र जाधव यांनी दिली आहे.