नागपूर :- संगीताचार्य गुरुवर्य कै.पं.अमृतराव निस्ताने यांना समर्पित अमृत प्रतिष्ठान नागपूर चा दोन दिवसीय रौप्यमहोत्सवी “त्रिवेणी संगीत समारोह -२०२४” जन्माष्टमी च्या पावन पर्वावर आयोजित करण्यात आला. या समारोहाचे उद्घाटन महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री मा.मुनगंटीवार यांचे हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष आणि भाजप चे संघटन मंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, उद्योजक आशिष गर्ग, अमृत प्रतिष्ठान चे मोहन निस्ताने, मोरेश्वर निस्ताने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे विमोचन आणि प्रसाद खापर्डे, देवेंद्र यादव, श्रीकांत पिसे, अवनींद्र शेवलीकर, चेतन बालपांडे या गायक वादक कलावंतांचा सत्कार करण्यात आला. मोहन निस्ताने यांनी अमृत प्रतिष्ठानची आयोजना मागील भूमिका मांडली. सोनाली अडावदकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. नंतरच्या सत्रात प्रसिद्ध गायक प्रसाद खापर्डे यांनी शास्त्रीय गायन सादर केले. त्यांनी सुरुवातीला राग केदार मध्ये विलंबीत आणि मध्यलयीत ‘कान्हा रे नंद नंदन’ ही बंदीश, त्यानंतर राग देस मधील ‘ चल कोकिया मधमास आया ‘ ही बंदिश आणि समापन ” बांसुरी बज रही धुन मधूर” या भैरवी ने केले. अतिशय स्पष्ट आलापी, सुरांचा मिलाप व जोरकस तानांचा साज चढविलेले गायन अतिशय प्रभावी आणि रंजक होते. त्यांना अतिशय दमदारपणे साजेशी साथ संगत संवादिनी वर श्रीकांत पिसे आणि तबल्यावर देवेंद्र यादव या प्रतिभावान कलावंतांनी केली.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी चा शुभारंभ गिरीष व्यास आणि डॉ.उपेंद्र कोठेकर यांचे हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आला. त्यानंतर पुष्कर देशमुख, संदेश पोपटकर व पवन सिडाम या वादकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. आयोजित संगीत सभेची सुरुवात अवनींद्र शेवलीकर आणि पुष्कर देशमुख यांच्या सतार- सरोद वादन या जुगलबंदी ने झाला. त्यांनी अतिशय रंजक असा राग यमन सुरेल आणि आकर्षकरित्या प्रस्तुत करून रसिक श्रोत्यांची दाद मिळविली.त्यांना तबल्यावर साजेशी साथ संदेश पोपटकर यांनी दिली. पुढील सत्रात प्रतिभावान युवा गायक चेतन बालपांडे यांनी आपले गायन प्रस्तुत केले. राग जोग मध्ये विलंबित ख्याल व नंतर मध्यलयीत पारंपारिक बंदीश ” साजन मोरे घर आयो” ही ‘प्रेमपिया’ अर्थात उस्ताद फैय्याज खाँ साहेब यांची बंदीश अतिशय प्रभावीपणे सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर राग पहाडी मध्ये रंजक ठुमरी सादर करुन प्रस्तुतीला विराम दिला. स्पष्ट स्वर, जोरकस तानांचा साज चढविलेले त्यांचे स्वर कानांना तृप्त करून गेले. त्यांना अतिशय साजेशी साथ संगत संवादिनी वर श्रीकांत पिसे आणि तबल्यावर पवन सिडाम मुंबई यांनी केली.
दोन दिवसीय त्रिवेणी संगीत महोत्सवातील ताल सुरांची लयलूट रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी व आनंदाची पर्वणी ठरली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपस्थित मान्यवर, रसिक श्रोते, कलावंत, परिश्रम घेतलेल्या सर्व स्वयंसेवक, हितचिंतकांचे अमृत प्रतिष्ठान तर्फे मन:पूर्वक धन्यवाद.