नागपूर :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘मेरी माटी, मेरा देश’ या अभियानाच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातून काढण्यात येत असलेल्या अमृत कलश यात्रेचे आज भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व माजी नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी स्वागत केले. यावेळी भाजपा भटके विमुक्त मोर्चा अध्यक्ष किशोर सायगण, मनपा कर्मचारी यूनियनचे पदाधिकारी लोकेश मेश्राम, मंगेश गोसावी, राम सामंत, सामाजिक कार्यकर्ते आशिष लोणारे, बूथप्रमुख विक्रम डुंबरे, शेषराव गजघाटे, दीपक खरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेनुसार देशाच्या कानाकोपऱ्यातून अमृत कलश यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेमध्ये घराघरातून माती किंवा अन्न धान्य संकलीत करून ती माती देशाची राजधानी दिल्ली येथील कर्तव्यपथावर साकारणाऱ्या अमृत वाटीकेसाठी वापरली जाणार आहे. या अभियानाच्या अंतर्गत नागपूर महानगरपालिकेची प्रत्येक झोनची अमृत कलश यात्रा वेगवेगळ्या परिसरांमध्ये जाऊन माती संकलीत करीत आहे.
नेहरू नगर झोनची अमृत कलश यात्रा प्रभाग २६ मध्ये पोहोचताच ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या मार्गदर्शनात परिसरातील नागरिकांनी यात्रेचे स्वागत केले. यावेळी उपस्थित नागरिकांनी हातामध्ये माती घेऊन पंच प्रण प्रतिज्ञा घेतली व त्यानंतर अमृत कलश मध्ये माती जमा केली. प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानास्पद वाटावे असे हे अभियान असून देशाच्या उभारणीमध्ये आपलेही योगदान आहे, ही भावना प्रत्येकामध्ये निर्माण करणारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे, असे यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व माजी नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले. त्यांनी नागपूर महानगरपालिकेद्वारे काढण्यात आलेल्या अमृत कलश यात्रेमध्ये नागरिकांनी सहभागी होऊन कलशामध्ये माती देण्याचे आवाहनही केले.