नागपूर :- केंद्र आणि राज्य शासनाचा निर्देशानुसार ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ अभियानांतर्गत नागपूर शहरातील दहाही झोन निहाय काढण्यात आलेल्या अमृत कलश यात्रेचे गुरुवार (ता.१९) रोजी सायंकाळी ४.३० वाजता नागपूर महानगरपालिका येथे आगमन होणार आहे. अमृत कलश यात्रेदरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्तपणे अर्पित केलेली मुठभर माती आणि तांदुळ असणारे अमृत कलश घेऊन संविधान चौक ते नागपूर महानगरपालिका यादरम्यान भव्य रॅली द्वारे आणण्यात येईल.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनस्तरावरुन भजन गात व नागरिकांचे प्रबोधन करीत अमृत कलश यात्रा काढण्यात आली. विविध झोनमध्ये स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी, गणमान्य व्यक्तींसह सर्वसामान्य नागरिकांनी यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवित मुठभर माती व तांदुळ या अमृत कलशांमध्ये अर्पित केले.
या भव्य रॅलीच्या माध्यमातून मनपाच्या दहाही झोनस्तरावरील अमृत कलशांचे नागपूर महानगरपालिका मुख्यालयात आगमन होणार आहे. रॅली दरम्यान मनपाचे अधिकारी, विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित राहतील. मनपा मुख्यालयातील हिरवळीवर हे अमृत कलश ठेवण्यात येणार असून, प्रत्येक कलशातून काही प्रमाणात नागरिकांनी अर्पित केलेली मुठभर माती व तांदुळ संकलित करून सर्व कलशांचे एक कलश तयार करण्यात येईल व नागपूर शहरातील मातीचा हा प्रतिकात्मक कलश राज्याची राजधानी मुंबई येथे येण्यात येईल येथून हे कलश देशाची राजधानी दिल्ली येथील कर्तव्य पथवर अमृत वाटिकेसाठी पाठविले जाणार आहेत.