– केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
नागपूर – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील नागपूर शहरातील अमरावती रोडवर उभारलेले जाणाऱ्या दोन उड्डाणपुलामुळे येथील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार असून इंधन तसेच वेळेची बचत होऊन अपघात मुक्त असा प्रवास सुरळीत होणार आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागपुरात केले.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय तसेच राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बांधल्या जाणाऱ्या या एकूण 4. 79 किलोमीटर लांबीच्या आणि 479 कोटी रुपयाच्या तरतुदीने आरटीओ ते विद्यापीठ कॅम्पस आणि राष्ट्रीय महामार्ग 53 वरील मारुती शोरूम ते वाडी पोलीस स्टेशन इथपर्यंत असणाऱ्या चौपदरी उड्डाण पुलाचे भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते . याप्रसंगी राज्य विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ‘ विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे , स्थानिक हिंगणा विधानसभा मतदार संघाचे आमदार समीर मेघे प्रामुख्याने उपस्थित होते .
याप्रसंगी नितीन गडकरी यांनी वाडी शहरातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना एकत्र येण्याचे आवाहन करत त्यांचे गोडाऊन नागपूर सुधार प्रन्यासच्या माध्यमातून ‘ट्रांसपोर्ट नगर ‘ बनवण्याचा प्रस्ताव मांडला . ट्रांसपोर्ट नगर जर निर्माण झाले तर इथली वाहतूक कोंडी थांबेल आणि इथल्या प्रदूषणामध्ये सुद्धा घट होईल असे त्यांनी नमूद केल . अमरावती महामार्ग महामार्गावरील 180 जागेवर पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कृषी कन्व्हेंशन सेंटर स्थापन करणार असल्याची सुद्धा घोषणा केली .रवी नगर येथील चार लेन रस्ता व त्यावर उभारला जाणारा चार लेनचा उड्डाणपूल यामुळे वाहतूक सुरळीत होईल . हे दोन्ही उड्डाणपुलांचे काम एका चांगल्या कंत्राटदाराला दिल्यामुळे त्याचं गुणवत्तापूर्वक काम होईल असे आश्वासन सुद्धा गडकरी यांनी दिले .यासोबतच त्यांनी फुटाळा तलाव जवळील रंगीत कारंजे, पुष्पवृष्टी असणारे बगीचे आणि नागपूर शहरात होणाऱ्या विविध विकास कार्याची माहिती उपस्थितांना दिली .यासोबतच त्यांनी पर्यावरण आणि परिसंस्थेत नागपूर शहर देशाच्या अव्वल स्थानी गेले पाहिजे अशी आशाही व्यक्त केली .
या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .