मुंबई :- अमरावती शहरातील इर्विन चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगतची जमीन पुतळा परिसर सौंदर्यीकरणासाठी संपादित करण्याची प्रक्रिया लवकरच करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य बळवंत वानखडे, सुलभा खोडके यांनी मांडली होती.
मंत्री विखे -पाटील म्हणाले की, अमरावती महानगरपालिका हद्दीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सौंदर्यीकरणाच्या प्रयोजनाकरिता इर्विन चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराजवळ असलेली जमीन संपादनाकरिता आयुक्त अमरावती महानगरपालिका यांनी सन २०१५ मध्ये प्रस्ताव सादर केला आहे. परंतु संबंधित भूधारकांनी मा. उच्च न्यायालयात याबाबत रिट याचिका दाखल केली असल्याने हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. याबाबत विधी व न्याय विभाग आणि संबंधित विभागांचा अभिप्राय घेऊन ही जागा सौंदर्यीकरणासाठी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.