नागपूर :- नागपूर महानगरपालिका व लक्षवेध बहुउद्देशीय संस्था नरेंद्रनगर यांच्या संयुक्त विद्यमाने नरेंद्र नगर स्थित लक्षवेध मैदानावर दिनांक 28 फेब्रुवारी 2025 ते 2 मार्च 2025 पर्यंत सकाळ व संध्याकाळ या सत्रामध्ये अखिल भारतीय “मुख्यमंत्री चषक” कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने तयार करण्यात येणाऱ्या मैदानाचे भूमिपूजन दिनांक 18 फेब्रुवारी रोजी माजी महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते झाले तर कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार व कबड्डी खेळाडू गिरीश व्यास यांच्या हस्ते झाले.
नरेंद्र नगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सचिव व ज्येष्ठ नागरिक सुरेश कर्दळे यांच्या हस्ते विधिवत मैदानाची पूजा करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत दुचक्के, संयोजक भूषण केसकर व संजय पवनीकर उपस्थित होते . याप्रसंगी बोलताना माजी महापौर संदीप जोशी यांनी मार्गदर्शन करताना स्पर्धा उत्तम होण्याच्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना कार्यकर्त्यांना दिली तर माजी आमदार गिरीश व्यास यांनी खेळाडूंना अतिशय उत्तम दर्जाची व्यवस्था पुरवण्याचे महत्त्व प्रतिपादन केले.
देशभरातील नामांकित कबड्डी खेळाडूंचा समावेश असलेली ही स्पर्धा अत्यंत व्यवस्थित पार पाडण्याचा विश्वास भूषण केसकर यांनी उपस्थितांना दिला कार्यक्रमाला परिसरातील नागरिक लक्षवेध चे सर्व कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पक्षाचे दक्षिण पश्चिम मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.