संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- राज्य शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून सुरुवात केली आहे. 21 ते 65 वर्षेपर्यंतच्या वयोगटातील सर्व पात्र महिलांना दर महिना 1500 रुपये शासन त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे.ज्यांचे ऑगस्ट पर्यंत अर्ज आले असतील अशा लाभार्थीना सुद्धा जुलै महिन्याची 1500 रुपये रक्कम मिळणार आहे.या योजनेनुसार महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत मिळणार असून राज्य शासनाची महिलांना बळकट करण्यासाठी लाडकी बहीण योजना महत्वपूर्ण ठरणार आहे .तेव्हा सर्व पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा व पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी स्थानिक प्रशासनाने पुढाकार घ्यावा असे मौलिक प्रतिपादन आमदार टेकचंद सावरकर यांनी आज कामठी येथील संगेवार सभागृहात आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आढावा बैठकीत व्यक्त केले.
याप्रसंगी माजी जी प सदस्य अनिल निधान,एसडीओ तहसिलदार गणेश जगदाळे,कामठी नगर परिषद व बिडगाव नगर पंचायत चे प्रशासक संदीप बोरकर,महादूला नगर पंचायत चे प्रशासक अमर हांडा, नायब तहसीलदार राजीव बमनोटे, जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे,माजी सभापती उमेश रडके,कामठी पंचायत समितीच्या प्रभारी महिला गटविकास अधिकारी, सभापती दिशाताई चनकापुरे, उपसभापती दिलीप वंजारी, पंचायत समिती सदस्य सोनू कुथें आदी उपस्थित होते.
शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांसाठी सुलभ होण्यासाठी प्रशासनाला जवाबदारी देण्यात आली आहे त्यामध्ये पात्र महिला लाभार्थ्याना ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेण्यासाठी प्रशासन किती कटिबद्ध आहे.यांच्याकडून उद्दिष्टपूर्ती होऊन कोणताही लाभार्थी वंचित राहता कामा नये यासाठी आमदार टेकचंद सावरकर यांनी आजच्या आढावा बैठकीत या योजनेशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची कान उघडणी करीत आढावा घेतला.दरम्यान कामठी तालुक्यातील कामठी शहर,बिडगाव व महादुला नगर पंचायत मिळून 22 हजार 500 लाभार्थीचे उद्दिष्ट आहेत त्यात कामठी शहरातील 17 हजार 500 लाभार्थीचे उद्दिष्ट आहे तर ग्रामीण भागात 26 हजार 500 लाभार्थीचा उद्दिष्ट आहे.तेव्हा कुणीही पात्र लाभार्थी वंचीत राहू नये यासाठी प्रशासनाने गांभीर्याची भूमिका घेण्याचे आदेश आमदार सावरकर यांनी दिले.
या आढावा बैठकीत कामठी तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी, शहर व ग्रामीण चे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी,ग्रामीण व नागरी प्रकल्पातील सर्व अंगणवाडी सेविका,पर्यवेक्षिका, नेमून दिलेले सनियंत्रण अधिकारी आदी उपस्थित होते.