– 4.84 कोटी रुपये किमतीचे 6.05 किलो सोने जप्त करण्यात आले
मुंबई :- मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ड्युटी फ्री दुकानात काम करणाऱ्या आणि सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीशी संबधित विमानतळ कर्मचाऱ्यांच्या गटाला महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ताब्यात घेतले. हे कर्मचारी आंतरराष्ट्रीय ट्रान्झिट टर्मिनलमधून छोट्या गटांमध्ये आणलेले सोने विमानतळाबाहेर पोहोचवून त्याची तस्करी करत होते. विमानतळाबाहेर तस्करीचे सोने घेऊन जात असताना डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी विमानतळाच्या दोन कर्मचाऱ्यांना अडवले. त्यानंतर केलेल्या कारवाईत ते सोने ताब्यात घेणाऱ्या दोन जणांना देखील ताब्यात घेतले. तपासणी दरम्यान 5 अंडाकृती आकाराच्या कॅप्सूल आणि मेणाच्या स्वरूपातील सोन्याच्या भुकटीची 2 पाकिटे आढळून आली. चौकशी नंतर, 4.84 कोटी रुपये किमतीचे 6.05 किलो सोने जप्त करण्यात आले. मेणाच्या स्वरूपातील (6.05 किलो) 4.84 कोटी रुपये किमतीची सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली, आणि सीमा शुल्क कायदा 1962 च्या तरतुदींनुसार चारही जणांना अटक करण्यात आली.