मुंबई :- भारतीय शिक्षण धोरणानुसार ‘एआय’ तंत्रज्ञान हे शिक्षणाला पर्याय नाही तर पूरक ठरेल या दृष्टीनेच शासन विचार करीत असून महाराष्ट्राचे ‘एआय’ धोरण तयार होत असून याबाबत आम्ही या धोरणात सातत्याने विचार करीत आहोत, अशी माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधान परिषदेत दिली.
“कृत्रिम बुध्दिमत्ता अर्थात एआय संदर्भात आमदार श्रीकांत भारतीय यांनी विधानपरिषद नियम ९७ नुसार या विषयावर चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेत आमदार ॲड. अनिल परब, अमित गोरखे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे आदी या चर्चेत सहभागी झाले.
या विषयाला उत्तर देताना मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले की, आज जगभर एआय तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने होत आहे. त्यामध्ये निर्माण होणाऱ्या संधी, रोजगार, उद्योग आणि तंत्रज्ञान यामध्ये आपला देश मागे पडू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे एआय धोरण तयार करण्याची भूमिका घेतली. याच धोरणाला सुसंगत असे राज्याचे स्वतंत्र एआय धोरण तयार करण्यात येत असून अशा प्रकारचे धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. या धोरणासाठी तज्ञांची समिती गठीत करण्यात आली असून त्यांच्या बैठका होत आहेत. या समितीसमोर शासनाने जे विषय ठेवले आहेत त्यामध्ये एआय आणि शिक्षणावर होणारे परिणाम हा विषय ठेवण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय शिक्षण व्यवस्थेला पूरकच ठरेल, असे राज्याचे एआय धोरण आम्ही तयार करीत आहोत तसेच शिक्षणासोबतच सायबर क्राईम या विषयाचा ही यामध्ये विचार करीत असल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले.