मुंबई :- विविध शासकीय पुरस्कारप्राप्त प्रगतशील व आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुभवाचा आणि सूचनांचा उपयोग सर्वसामान्य शेतकऱ्यांना होईल, यासाठी शासन प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मंत्रालयात विविध पुरस्कार प्राप्त प्रगतशील व आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेतकऱ्यांना २४ तास वीज, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, तक्रार समित्यांवर शेतकऱ्यांची नियुक्ती या विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच या शेतकऱ्यांच्या विविध सूचना व मागण्या मंत्री धनंजय मुंडे यांनी समजून घेतल्या.
कोविड व इतर कारणांमुळे रखडलेले पुरस्कारांचे वितरण लवकरच केले जाणार असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले. तसेच कृषी विभागाशी संबंधित मागण्यांचा सकारात्मकपणे विचार करुन त्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी आश्वासित केले.
याप्रसंगी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील सर्व कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी, प्रतिनिधी यांची चारही विद्यापीठांचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व कुलगुरू, कृषी आयुक्त यांच्या समवेत एक राज्यस्तरीय संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निर्देश महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालकाना दिले.
या बैठकीस कृषी आयुक्त सुनील चव्हाण, कृषी विभागाच्या सहसचिव सरिता बांदेकर देशमुख, सहसचिव गणेश पाटील, कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषी भूषण पुरस्कार प्राप्त प्रकाश पाटील, उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी प्रवीण पाटील, वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार प्राप्त विजय चौधरी, कृषी भूषण नाथराव कराड, पंडित दीनदयाळ पुरस्कार प्राप्त प्रल्हाद वरे, कृषीरत्न संजीव माने, राजेंद्र गायकवाड, कृषीभूषण यज्ञेश सावे, शेतीमित्र वालचंद धुनावत, कृषीभूषण मच्छिंद्र कुंभार तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे बीजोत्पादन अधिकारी उदयकुमार काचोळे, मृद रसायनशास्त्रज्ञ डॉ. व्ही. एस. पाटील, डॉ. अमोल मिसाळ, डॉ भरत वाघमोडे, डॉ. हरिहर कौसडीकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.