नागपूर :- राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे कपासी पिकावर आकस्मिक मर (पॅरा वील्ट) रोग दिसून येत आहे. तूर पिकावरील खोड माशी, सोयाबीनवरील स्पोडोप्टेरा अळी, मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी आदींच्या व्यवस्थापनासाठी कृषी विभागातर्फे सल्ला देण्यात आला आहे.
मोठ्या पावसामुळे जमीनीत आद्रता निर्माण झाल्याने आणि साचलेल्या पाण्यामुळे आकस्मिक मर विकृतीचा प्रादुर्भाव कापूस पिकावर दिसून येते यामुळे झाडातील तेजपणा नाहीसा होऊन झाड एकदम सुकल्यासारखे दिसते. अशात आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या पिकावर प्रदीर्घ पाण्याचा तान पडू देऊ नये तसेच अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतात पाणी साचणार नाही व साचलेले पाणी त्वरित शेताबाहेर काढण्याच्या सूचना कृषी विभागातर्फे करण्यात आल्या आहेत. तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा आणि मर रोगाचे लक्षण झाडाच्या मुळाशी आढळल्यास कॅापर ऑक्सीक्लोराइड (२५ ग्रॅम) किंवा कार्बेन्डाझीम (१० ग्रॅम) + युरिया (२०० ग्रॅम) १० लिटर पाण्यात मिसळून प्रत्येक झाडास २५०-५०० मिलीची झाडाच्या मुळाशी आळवणी करावी. त्यानंतर ८ ते १० दिवसांनी २% डीएपी (२०० ग्रॅम/ १० लि. पाणी) हलके पाणी देऊन आळवणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तूर पिकावरील खोड माशीच्या प्रादुर्भावापासून संरक्षणासाठी ५% निंबोळी अर्क किंवा डायमेथोएट ३०% १५ मिली १० लिटर पाण्यातूंन फवारणी करावी. तूर पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भावाचा अंदाज समजण्यासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे ५० मिटर अंतरावर शेतात उभारण्याच्या मार्गदर्शक सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत.
सोयाबीन पिकामध्ये स्पोडोप्टेरा अळीचा उपद्रव टाळण्यासाठी हेक्टरी ५ स्पोडोलूरचा वापर करण्यात आलेले फेरोमेन सापळे वापरावे. मका पिकावर १०% पेक्षा जास्त अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास क्लोरानट्रानीलीप्रोल १८.५% एस. सी. ०.४ मिली प्रति लिटर पाणी किंवा स्पीनोटोराम ११.७% एस. सी ०.५ मिली प्रति लिटर किंवा इमामेक्टिन बेंझोंएट ५% एस. जी. ०.४% ग्रॅम प्रति लिटर पाणी वापरुन फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
भुईमूग पिकावरील रसशोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी फ्लुबेन्डामाइड ३.५% + हेक्साकोनॅझोल ५% डब्ल्युजी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी तर भात पिकावरील तपकिरी आणि हिरव्या तुडतुड्यांपासून पिकाचे संरक्षण करण्याकरिता फिप्रोनिल ५ % एस. सी २० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे.