– सोयाबिन खरेदीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
यवतमाळ :- यवतमाळ हा कापुस व सोयाबीन उत्पादक जिल्हा आहे. या हंगामाकरीता सोयाबीनसाठी प्रति क्विंटल ४ हजार ८९२ आणि कापसासाठी प्रति क्विंटल ७ हजार २० असे हमीभाव घोषित करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत बाजार समित्यांमध्ये नवीन हंगामातील सोयाबीन या शेतपिकाची आवक सुरु झाली आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणतांना वाळवून आणावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
सोयाबीन आणि कापुस या शेतमालाच्या किमान आधारभुत किंमत दराने खरेदीकरीता जिल्ह्यात शासनाकडुन खरेदी केंद्रे मंजुर करण्यात आली असुन सोयाबीन खरेदी सुरु झाली आहे. दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशनमार्फत ७ व विदर्भ को-ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशनमार्फत ७ अशी एकुण १४ खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. सदर खरेदी केंद्रांवर सोयाबीन नोंदणी तसेच खरेदीची प्रक्रीया सुरु झालेली आहे.
शेतकरी सोयाबीन विक्रीस आणतांना त्यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने त्याची खरेदी किमान आधारभुत किंमतीने होण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. किमान आधारभूत किंमत खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रीस आणतांना शेतकऱ्यांनी सोयाबीनमध्ये ओलाव्याचे प्रमाण हे १२ टक्के पेक्षा जास्त नसल्याची आणि काडीकचऱ्याचे प्रमाण अधिक नसल्याची खात्री करावी.
ज्या शेतकऱ्यांना आपल्या सोयाबीनमधील ओलाव्याच्या प्रमाणाबाबत खात्री करावयाची असेल अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या सोयाबीनचा नमुना त्यांच्या तालुक्याच्या शासकीय खरेदी केद्रांवर आणुन सोयाबीनमधील ओलाव्याचे प्रमाण तपासुन घ्यावे, जेणे करून ओलावा जास्त असल्याच्या कारणास्तव त्यांनी विक्रीस आणलेला शेतमाल नाकारण्यात आल्यास परत वाहतुक करण्याचा आर्थिक भुर्दंड बसणार नाही.
सीसीआय या यंत्रणेमार्फत शासकीय हमी दराने कापुस खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात एकुण १४ कापुस खरेदी केंद्रे मंजुर करण्यात आली आहे. या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. किमान आधारभुत किंमत खरेदी केंद्रांवर कापुस विक्रीस आणतांना शेतकऱ्यांनी कापसामध्ये ओलाव्याचे प्रमाण हे ८.५ टक्के पेक्षा जास्त नसल्याची आणि काडीकचऱ्याचे प्रमाण अधिक नसल्याची खात्री करावी.
किमान आधारभुत किंमत खरेदी केंद्रावर सोयाबीन तसेच कापुस विक्रीसाठी आणण्यापुर्वी वाळवुन, सुकवुन आणल्यास त्यामध्ये ओलाव्याचे प्रमाण हे अनुज्ञेय प्रमाणापेक्षा जास्त राहणार नाही व त्यामुळे शेतमाल खरेदी दरम्यान शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, असे सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी कळविले आहे.