– भाजपा आ. नितेश राणे यांचे आ. आदित्य ठाकरे यांना आव्हान
मुंबई :- दिशा सालीयानच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांना छत्रपती संभाजीनगरमधील रामा हॉटेलमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जनतेच्या मनातील प्रश्न विचारण्यासाठी गेले असता आदित्य ठाकरे यांनी तेथून पळ न काढता उत्तर द्यायला हवे होते. तुमचे चारित्र्य स्वच्छ असते तर छातीठोकपणे उत्तर द्यायला हवे होते मात्र तुम्ही तसे न करता पळ का काढला… हॉटेल बाहेर येण्याची हिंमत का नाही दाखवली, असे परखड सवाल भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी सोमवारी उपस्थित केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ता ओमप्रकाश चौहान उपस्थित होते.
आ. राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे अलीकडे महिला अत्याचारावर बोलत आहेत. मात्र आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यावर महिला अत्याचार प्रकरणी अनेक आरोप झाले आहेत. आदित्य ठाकरे यांना दिशा सालीयान वरील सामुहिक बलात्कार, तिच्या खून प्रकरणी प्रश्न विचारण्यात काहीच चुकीचे नाही. पत्रकारांनी आदित्य यांना प्रश्न केला असता ते सांगतात की हा राजकीय विषय आहे पण दिशा, सुशांतसिंग राजपूत खून प्रकरण तसेच अल्पवयीन मुलांच्या छळाचा मुद्दा हा राजकीय विषय होऊच शकत नाही असा प्रहार आ. राणे यांनी केला.
आदित्य यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिशा सालीयान खून प्रकरणी आपला संबंध नाही असे पुरावे द्यायला हवे होते. आदित्य यांनी ८ जून च्या त्यांच्या लोकेशनचे पुरावे देत केले जाणारे सर्व आरोप खोटे असल्याचे सिद्ध करायला हवे होते. तुमचे निर्दोषत्व सिद्ध केले तर मी ठाकरे कुटुंबाची माफी मागायला तयार आहे असेही आव्हान आ. राणे यांनी दिले.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिशा प्रकरणी आरोप झालेल्या आदित्य यांचा राजीनामा का घेतला नाही. उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर डॉ. स्वप्ना पाटकर यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. या महिलेने संजय राऊत यांच्याविरुद्ध उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तक्रार केली होती. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळेच महिला अत्याचार प्रकरणी बोलण्यापूर्वी आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी स्वतःच्या अंतरंगात डोकावून पहावे, असेही आ. राणे म्हणाले.