– अस्सल वैदर्भिय ‘स्थळ’चित्रपट वितरणाचे घेतले पालकत्व
– पत्रकार परिषदेत साधला संवाद
नागपूर :- अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या माय मराठी भाषेत, निर्माण होणा-या मराठी चित्रपटांना आपल्या मराठी राज्यात चित्रपटगृहे मिळवण्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात.चित्रपटगृह मिळाले तरी मराठी भाषिकांचा अल्प प्रतिसाद मिळाल्यास एका आठवड्यानंतर मल्टीफ्लॅक्सच नव्हे तर एक पडदा (सिंगल स्क्रीन)चिटपटगृहातून मराठी चित्रपट काढला जातो परिणामी,संघर्षाचे वाटेकरी होऊन, आर्थिक बाबींची जुळवाजुळव करुन,प्रसंगी कर्जाऊ रक्कम घेऊन चित्रपट निर्माण करणा-या निर्मात्याला आर्थिक डबघाईस येण्या वाचून पर्याय नसतो.अस्सल वैदर्भिय असणारा व डोंगरगावचे युवा लेखक,दिग्दर्शक आणि निर्माते जयंत दिगंबर सोमलकर निर्मित ‘स्थळ’या चित्रपटाच्या वाट्याला देखील अशीच विवंचना आली.मात्र,सुप्रसिद्ध अभिनेते व निर्माते सचिन पिळगांवकर यांनी ही बाब कळल्यावर या युवा निर्मात्याच्या मदतीसाठी पुढकार घेऊन, या चित्रपटाचे प्रस्तुतीकरण स्वीकारुन वितरकांपर्यंत मराठी मातीतला हा चित्रपट मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी चंग बांधला.सचिन हे त्यांच्या चित्रपटांच्या वितरणाची जबाबदारी ज्या वितरकांवर असते त्या वितरकांच्या माध्यमातून हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व महत्वाच्या शहरात पत्रकार परिषद घेत आहेत.नागपूरात त्यांनी गुरुवार दिनांक २१ रोजी प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेऊन या चित्रपटाच्या निर्मिती मागील पार्श्वभूमी विशद केली.ग्रामीण भागातील लग्ना पूर्वी मुलगी बघण्याच्या प्रथेवर ‘स्थळ’ हा चित्रपट आधारित आहे.या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला.हा चित्रपट अनेक महोत्सवात दाखवण्यात आला असून अनेक पुरस्कारप्राप्त या चित्रपटालाही मात्र,इतर मराठी चित्रपटांसारखेच वितरणाच्या साखळीवर अपयशाचा सामना करावा लागला.
गोवा येथील ‘मामी’महोत्सवात हा चित्रपट दाखविण्यात आला होता जो सचिन यांच्या कन्या श्रिया यांनी तो बघितला.मुंबईत परतल्यावर श्रिया यांनी या चित्रपटाचे कौतूक सचिन व आई सुप्रियाकडे देखील केले होते.श्रिया हिच्या आग्रहामुळेच अमेरिकेत ‘नाफा‘चित्रपट महोत्सवात सचिन व सुप्रिया यांनी हा चित्रपट बघितला व त्यांनाही तो खूप आवडला.परिणामी,या चित्रपटाविषयी सचिन,सुप्रिया यांनी दिग्दर्शक जयंत सोमलकर यांच्यासोबत संवाद साधला होता व कोणतीही मदत लागल्यास हक्काने सांगण्याची सूचना ही केली होती.त्या वेळी सोमलकर यांना चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी काही अडचणी येतील असे वाटले नव्हते मात्र,वितरणाच्या आघाडीवरील धरातळावरील वास्तव लवकरच त्यांच्या लक्षात आले.एवढी चांगली कलाकृती फक्त चित्रपट महोत्सवापुरतीच बंदिस्त होऊ नये व मराठी प्रेक्षकांपर्यत सर्वांचीच मेहनत पोहोचावी यासाठी सोमलकर यांनी सचिन यांना भेटून पुढाकार घेण्याची विनंती केली.
त्यामुळे ‘नवरा माझा नवसाचा(भाग २)साठी व त्या पूर्वीच्या देखील सचिन यांच्या चित्रपटांसाठी वितरणाची जबाबदारी सांभाळणारे वितरकांची भेट घेत, अस्सल वैदर्भिय ‘स्थळ’या चित्रपटाला चित्रपटगृहे मिळवून देण्याची जबाबदारी सचिन यांच्या पुढाकारातून वितरकांनी घेतली.सचिन हे ‘स्थळ’ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते झाले.या चित्रपटात काम करणारे सर्व कलावंत यांनी कधीही कॅमरा समोर अभिनय केला नव्हता,हे विशेष.मुख्य अभिनेत्री नंदिनी चिकटे,तारानाथ खिरटकर,संगीता सोनेकर,सुयोग धवस,संदीप सोमलकर,संदीप पारखी,स्वाती उलमाले,गौरी बदकी,मानसी पवार हे सर्व कलावंत हे पहिल्यांदा कॅमरा समोर आले.महत्वाचे म्हणजे हे सर्व कलावंत विदर्भातील आहेत. ग्रामीण परिघातात खोलवर रुजलेल्या मुलगी दाखवण्याच्या प्रथेला अनुसरुन निर्माण झालेल्या ‘स्थळ’या चित्रपटाची कथा खूप संवेदनशील असल्याचे सचिन यांनी सांगितले.
या चित्रपटात पुणे-मुंबईचे कोणतेही कलावंत नसून डोंगरगावचे कलावंत आहेत.अमेरिकेत मराठी प्रेक्षक या चित्रपटाला खूप प्रतिसाद देत होते.हा चित्रपट सर्वांच्याच मनाला भावला. त्यामुळेच हा चित्रपट महाराष्ट्रातील माय मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हवा,या उद्देशानेच मी या चित्रपटाचा प्रस्तुतकर्ता झालो असल्याचे सचिन यांनी सांगितले.सचिन या नावासोबत ६२ वर्षांपासून महाराष्ट्रच नव्हे तर देशातील मायबाप प्रेक्षकांनी नांत जपलं,मोठ्यांनी,लहानांनी,पत्रकारांनी साथ दिली,कधी चांगलं काम केलं कधी नाही आवडलं मात्र,चित्रपटांच्या पलीकडे सचिन म्हणून माझ्यासोबत मायबाप रसिकांनी एक नांत जपलं आहे.त्याच प्रेमाच्या पोटी मी एक नव्या धाटणीचा हा चित्रपट प्रस्तुत करीत आहे,त्याला देखील माय बाप रसिक प्रेक्षकांनी तितकीच भरभरुन साथ द्यावी,असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले.
नुसतं चित्रपट प्रदर्शित करणं ही एक कृती झाली मात्र,त्या पलीकडे शौकत पठाण सारख्या वितरकाने समोर येऊन उत्साह दाखवणे हे ‘चार चांद’लागण्यासारखे कार्य आहे.शौकत याने मुंबईत येऊन स्वत: हा चित्रपट पाहिला व वेडा होऊन स्वत: म्हणतो की या चित्रपटासाठी आपण काही तरी करु,हेच या चित्रपटाचं यश असल्याचे सचिन म्हणाला.या चित्रपटात ‘फेस व्हॅल्यू ’जरी नसली तरी ‘कन्टेन्ट व्हॅल्यू ’आहे,इतका आशयघन या चित्रपटाची कथा आहे.या चित्रपटाची मांडणी या चित्रपटाचा प्राण आहे.कुठेही तडजोड न करता जयंतने हा चित्रपट बनवला आहे.जयंतला नाटकातले,सिनेमातले अनेक कलावंत त्याच्या या चित्रपटासाठी नक्कीच मिळाले असते मात्र,जयंतला त्याच्या गावातले खरे किरदार हवे होते.आपण फक्त आता ज्येष्ठ नागरिक नसून आपली नैतिक जबाबदारी आहे आपण हा चित्रपट यशस्वी करु,असे सचिन सांगतो.
माझ्या निर्मितीतला पहीला चित्रपट ‘नवरा माझा नवसाचा’ नागपूरात सर्वात आधी प्रदर्शित झाला.नागपूरकरांनी त्या चित्रपटाला अक्षरश:डोक्यावर घेतले.नव्वदीच्या दशकात माझा ‘गंमत जंमत’हा चित्रपट देखील विदर्भातच पहिल्यांदा प्रदर्शित झाला व माझ्या त्या ही चित्रपटाला विदर्भात भरपूर प्रतिसाद मिळाला.ज्या काळी मला खरोखरंच आर्शिवादाची गरज होती त्यावेळी वैदर्भिय रसिक माझ्या पाठीशी उभे झाले,हे मी कधीही विसरु शकत नाही,अशा शब्दात सचिन यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी बोलताना जयंत यांनी या चित्रपट निर्मिती मागील भूमिका विशद केली.या चित्रपटाची कथा अगदी लहानपणापासून निरीक्षणातून मनात तयार झाली होती.मला दोन बहीणी असून पाच चुलत बहीणी आहेत.मुलगी बघणे ही एक प्रथा आहे,ती चांगली की वाईट यावर प्रश्न करु शकत नाही.अशा बैठकीत मुलीचा रंग,चालणे,बोलणे याचे निरीक्षण केले जाते,कधी कधी मुलीला या वरुन टिकेचाही सामना करावा लागतो.हे कुठेतरी मनाला त्याच वेळी खटकलं होतं.मुंबईत येऊन पत्नी शेफालीला मनातलं हे शल्य सांगितलं,त्यावेळी तिने सांगितलं की तू यावर लिही.त्यातून मी या चित्रपटाची कथा लिहली.चित्रपटात मला माझ्याच गावातील कलावंत हवे होते त्यामुळे मी विदर्भातील काही महाविद्यालयात ऑडिशन घेतले.
वरोरातील आनंद निकेतनमध्ये मी शिकलो आहे त्यामुळे पहिल्यांदा मी त्या महाविद्यालयात ओपन मंचावर विद्यार्थिंनीकडून सादरीकरण करुन घेतले.अनेक विद्यार्थिनींनी ऑडिशन दिले त्यात नंदिनी पण होती मात्र,सर्वांचे ऑडिशन संपल्यानंतर पुन्हा ती माझ्याजवळ आली व तिला पुन्हा एक संधी देण्याची तिने विनंती केली कारण तिचं समाधान झालं नव्हतं.तिला ते पुन्हा करुन दाखवायचं होतं.मी तिला म्हटले, संपली आहेत ऑडिशन, तुलाही नक्की कळवू,पण तिचे समाधान झाले नव्हते.ती म्हणाली मी रडू शकते,गाऊ शकते,नृत्य करु शकते मात्र,मी तिला पुन्हा ऑडिशन देऊ दिली नाही.
यानंतर आम्ही चंद्रपूरच्या पत्रकार भवनात सर्वांसाठी ऑडिशन ठेवली ज्यात सगळे वयोगटाचे लोक सहभागी झाले होते.त्यात पुन्हा मला नंदिनी दिसली.तिला विचारले तू कालच तर ऑडिशन दिले,त्यावर ती म्हणाली,माझं समाधान झालं नाही, मला पुन्हा एकदा ऑडिशन द्यायचे आहे.त्या क्षणी मला तिच्यातली अभिनयाची ‘भूक’कळली.४० किलोमीटर दूर ती पुन्हा एकदा ऑडिशन द्यायला आली होती!मी तिला एक लहानशी स्क्रीप्ट दिली व बाहेर जाऊन अर्धा तासात तू हे तयार करुन येण्यास सांगितले.तिने ते खूप छान सादर केले आणि अशाप्रकारे नंदिनीची मुख्य पात्रासाठी निवड झाल्याचा प्रसंग जयंत यांनी सांगितला.प्रतिभा सर्वांमध्ये असते मात्र,अभिनयाची भूक ही जास्त महत्वाची होती,असे जयंत म्हणाले.
नुकताच एक विदर्भातल्याच मातीतला एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला,त्या अनुषंगाने झालेल्या पत्रकार परिषदेत जे चित्रपटतज्ज्ञ आहेत किवा ज्यांचा मराठी चित्रपटाशी जवळचा संबंध येतो त्यांनी सचिन-लक्ष्मीकांत बेर्डे-अशोक सराफ किवा महेश कोठारे काळातील मराठी चित्रपटांवर प्रहार करीत, तुम्ही त्या काळातील मराठी प्रेक्षकांसमोर नेमके काय सादर केले?उदाहरणत: ‘बनवा बनवी’चित्रपट मुंबईच्या प्रेक्षकांना समोर ठेऊन निर्मित करण्यात आला,विदर्भात किवा नागपूरात घर भाड्याने मिळण्याचा समस्या नाहीत,परिणामी त्या काळात मराठी प्रेक्षक आशयगर्भित मराठी चित्रपटांना मुकला,आता अलीकडच्या काळात गंभीर तसेच आशयगर्भित विषय घेऊन मराठी चित्रपट बनतात आहेत,तो आशय सचिन सारख्या कलावंतांला किवा निर्मात्याला त्या काळी निर्मित करता आला नाही,मात्र त्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर आज ‘स्थळ‘सारख्या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता होऊन तुमच्या टिकाकारांना तुम्ही हे उत्तर दिले आहे का?असा सवाल केला असता,‘माझा प्रेक्षक माझ्यावर खूश आहे!’असे मिश्किल उत्तर सचिन यांनी दिले.कोणाला काय माहिती जे आज आमच्यावर आरोप करतात त्यांनी देखील त्या काळी ब्लॅकमध्ये तिकीट काढून आमचा चित्रपट बघितला नसेल!‘ह्दयी वसंत फूलताना’यावर डोलले नसतील?अशी साद घातली नसेल?कदाचित त्यांचं कोणी आज ऐकत नसतील त्यामुळेच ते असे आरोप करीत असतील जेणेकरुन कोणी तरी त्यांना ऐकावं!६२ वर्ष सुरु आहे माझं करिअरचं,अशी पुश्तीही त्यांनी जोडली.
याप्रसंगी नंदिनी हिने तिचा अनुभव सांगताना,तिच्या महाविद्यालयात ऑडिशन घेणार असल्याचे माहिती होताच मला माझ्या आयुष्यात कोणता तरी बदल होणार असल्याची प्रखर जाणीव झाल्याचे सांगितले.माझ्यासाठी ती एक संधी होती जी मला साध्य करायची होती,असे तिने सांगितले.चित्रपटात सविताची भूमिका वठवताना एका दृष्यात तुझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते,ते गिल्सरीन होते का?असा सवाल केला असता,दोन मिनिटांचे ते दृष्य चित्रित करताना मला खरोखर अश्रू आलेत,असे नंदिनी हिने सांगितले.
मराठी चित्रपटाला मल्टीफ्लॅक्समध्ये स्क्रीन मिळत नाही, मिळाले तरी एका आठवड्यापेक्षा जास्त मराठी चित्रपट चालत नाही,नुकताच विदर्भाचाच अप्रतिम चित्रपट ‘स ला ते स ला ना ते’हा देखील एकाच आठवड्यात चित्रपटगृहातून उतरला,याकडे सचिन यांचे लक्ष वेधले असता,मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नाही हे बोलणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.चुकीचं आहे असे म्हणणार नाही कारण तुम्हाला पूर्ण अधिकार आहे मला प्रश्न विचारण्याचा मात्र,मला तरी तसा अनुभव आला नाही. मराठी चित्रपट हा मराठी प्रेक्षकांनी चालवायला हवा.इतका चांगला कन्टेंट असणा-या चित्रपटालाही जर सात ते आठ प्रेक्षक उपस्थित राहत असतील तर यात चित्रपटगृहांच्या मालकांची काय चूक?असा सवाल ते करतात.माझे चित्रपट एक नव्हे तर आठ-आठ आठवडे चित्रपटगृहांमध्ये चालले आहे.याच विषयावर बोलाताना वितरक शौकत पठाण म्हणाले की,प्रेक्षक आले तरच मराठी चित्रपट चालू शकतात.
चित्रपटात नंदीनीच्या बाबांची भूमिका वठवणारे व दौलतरावाची भूमिका साकारणारे यांनी देखील चित्रपटाविषयी आपला अनुभव सांगितला.यावेळी त्यांना देखील एक लहान मुलगा आहे मात्र,मोठ्या झाल्यानंतर आता हा चित्रपट केल्यानंतर मुलाच्या लग्नाच्या वेळी ‘कांदे पोहे’या प्रथेविषयी काय भूमिका घ्याल?असा प्रश्न केला असता,मी निश्चितच यात बदल घडवून आणण्यचा प्रयत्न करेल,असे उत्तर त्यांनी दिले.
दिग्दर्शक जयंत दिगंबर सोमलकर यांनी शॉर्ट फिल्म्ससह ‘गिल्टी माईंड्स’ या गाजलेल्या वेब सीरिजचं सहदिग्दर्शन केलं होतं. “स्थळ” हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला आणि तिथे त्याला सर्वश्रेष्ठ आशिया पॅसिफिक फिल्मसाठी NETPAC अवॉर्ड सुद्धा मिळाला. त्यानंतर तब्बल २९ महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवला गेला आहे आणि १६ पेक्षा जास्त पुरस्कारही पटकावले आहेत. त्यामुळेच मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे. महिला दिनाच्या औचित्याने ७ मार्च रोजी ‘स्थळ’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.