– मनपाचे कठोर पाऊल : तक्रारीसाठी व्हॉट्सॲप क्रमांक जारी
नागपूर :- पर्यावरण तसेच मनुष्य प्राण्यांकरिता घातक प्रतिबंधित नायलॉन मांजाबाबत नागपूर महानगरपालिकेने कठोर पाऊल उचलले आहे. नायलॉन मांजाची विक्री, हाताळणी, वापर, साठवणूक केल्यास मनपाद्वारे नियमान्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनामध्ये उपायुक्त विजय देशमुख यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
मा. उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथे दाखल जनहित याचिका धील प्राप्त आदेशान्वये तसेच महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण विभागाद्वारे पर्यावरण (संरक्षण) कायद्यान्वये पतंग उडविण्यासाठी मकरसंक्रात सणाच्या वेळी कृत्रिमरीत्या/प्लास्टीकपासून बनवलेल्या नायलॉन मांजा अर्थात पक्क्या धाग्यांचा करण्यात येणारा वापर, विक्री, हाताळणी व साठवणुकीवर बंदी घालण्यात आलेली आहे. या माजांच्या वापरामुळे पक्षांना व मानवी जीवितांना तीव्र इजा होण्याचा धोका असतो. तसेच या मांजामुळे जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी मनपाद्वारे नागपूर शहर क्षेत्रातील सर्व मांजा विक्रेत्यांना नायलॉन मांजाची विक्री, हाताळणी आणि साठवणूक न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असे करताना आढळून आल्यास त्यांच्यावर नियमान्वये कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे.
नागपूर शहरामध्ये कुणीही व्यक्ती नायलॉन मांजा विक्री करताना आढळल्यास मनपाच्या 8600004746 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तसेच नागपूर महानगरपालिकेच्या @ngpnmc या फेसबुक आणि इंस्टाग्राम तसेच @ngpnmc या ट्विटर अधिकृत अकाउंट वर माहिती द्यावी, असे आवाहन उपायुक्त विजय देशमुख यांनी केले आहे.