– मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार झोनस्तरावर कारवाईला गती
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील बाजारांची स्वच्छता, सुस्थिती आणि शिस्तबद्धतेसाठी ‘स्वच्छ मार्केट’ स्पर्धा घेण्यात येत आहेत. या स्पर्धेमध्ये दहाही झोनमधील वेगवेगळ्या बाजारांचा सहभाग घेण्यात आलेला आहे. या बाजारांमध्ये असलेले अतिक्रमण काढण्याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सक्त निर्देश दिले होते. त्यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण विभागाद्वारे कारवाई दररोज सुरू करण्यात आलेली आहे.
नागपूर महानगरपालिकेद्वारे ‘स्वच्छ मार्केट‘ स्पर्धेची घोषणा केल्यानंतर या स्पर्धेसाठी शहरातील विविध मोठ्या तसेच महत्वाच्या बाजारांची निवड करण्यात आली. खामला बाजार, गोकुळपेठ बाजार, सीताबर्डी बाजार, नेताजी मार्केट व्यापारी संघ, महात्मा फुले पुष्प उत्पादक असोसिएशन, नॅशनल गांधी मार्केट सक्करदरा, कॉटन मार्केट (महात्मा फुले मार्केट असोसिएशन), शाहु समाज मार्केट सक्करदरा, महल मार्केट (नागपूर फेरीवाला फुटपाथ दुकानदार संघ), मछली मार्केट, होलसेल क्लॉथ मार्केट, संत्रा मार्केट, पॉप्युलर होलसेल क्लॉथ मार्केट गांधीबाग, नागपूर हॅन्डलूम क्लॉथ मार्केट गांधीबाग, टिंबर मर्चंट असोसिएशन नागपूर, गांधीखेत महल व्यापारी सेवा मंडळ, इतवारी मार्केट (नागपूर जनरल मर्चेंट असोसिएशन), कृषी उत्पन्न बाजार समिती कळमना नागपूर, कमल मार्केट, जरीपटका मार्केट (जरीपटका दुकानदार संघ), मंगळवारी बाजार (बेकायदेशीर मार्केट), गड्डीगोदाम दुकानदार संघ या व्यापारी संघांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे.
स्वच्छ मार्केट स्पर्धेमध्ये सहभागी सर्व बाजारपेठ अतिक्रमणमुक्त असावेत व बाजारामध्ये सुसूत्रता असावी यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासनाला दिले होते. त्यांच्या निर्देशानुसार दहाही झोनस्तरावर अतिक्रमण पथक आणि उपद्रव शोध पथक यांच्याद्वारे संयुक्त कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. या कार्यवाहीद्वारे स्पर्धेत सहभागी बाजारपेठांमध्ये अतिक्रमण निर्मूलनाच्या कारवाईला गती देण्यात आलेली आहे. बाजार परिसरामध्ये निश्चित जागांवर व्यवसाय न करणारे, रस्त्यावर दुकान लावणारे, वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे अशा व्यावसायीकांवर अतिक्रमण पथकाद्वारे कारवाई करण्यात येत आहे.
अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण विभाग प्रमुख हरीश राऊत यांच्या नेतृत्वामध्ये दहाही झोनमधील अतिक्रमण पथक आणि उपद्रव शोध पथकाच्या जवानांद्वारे संयुक्तरित्या कारवाई करण्यात येत आहे.