नागपूर : प्रतिबंधित प्लास्टिक संदर्भात नागपूर शहरात १ जुलैपासून नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकामार्फत धडक कारवाई करण्यात येणार आहे. सिंगल यूज प्लास्टिक साहित्याची निर्मिती, आयात, साठवणूक, वितरण, विक्री आणि वापर यावर १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे प्रतिबंध लावण्याबाबत केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाने १२ ऑगस्ट २०२१ रोजी अधिसूचना जारी केली. त्यानुसार ही कारवाई केली जाणार आहे.
प्रतिबंधित प्लास्टिक बंदी बाबत करावयाच्या अंमलबजावणी संदर्भात मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या अध्यक्षतेते गुरूवारी (ता.१६) मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहात मनपा व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांची बैठक पार पडली. बैठकीत मनपाचे मुख्य अभियंता प्रदीप खवले, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नागपूरचे उपप्रादेशिक अधिकारी उमाशंकर बहादुले, क्षेत्र अधिकारी मनोज वाटाणे, प्रमोद लोणे आदी उपस्थित होते.
केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाच्या निर्देशानुसार ३० सप्टेंबर २०२१ पासून ७५ मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या सर्व प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच ३१ डिसेंबर २०२२ पासून १२० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या सर्व प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी राहील. सजावटीसाठीचे प्लास्टिक व पॉलिस्टीरिन (थर्माकोल), मिठाईचे बॉक्स, निमंत्रण पत्रिका, सिगारेटची पॉकिटे, प्लास्टिकच्या कांड्यासह कानकोरणी, फुग्यांना लावण्यात येणा-या प्लास्टिक कांड्या, प्लास्टिकचे झेंडे, आईसक्रीम कांड्या, प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी – जसे काटे चम्मच, चाकू, स्ट्रॉ, ट्रे. १०० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर, कचरा व नर्सरीसाठी उपयोगात येणा-या पिशव्या वगळता सर्व कम्पोस्टेबल प्लास्टिक, पकड असलेल्या व नसलेल्या सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या (कॅरी बॅग), डिश बाउल, कंटेनर (डबे) आदींना प्रतिबंधित करण्यात आले आहे. उपरोक्त प्रतिबंधित सर्व प्रकारच्या प्लास्टिकचा वापर हा पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत घातक आहे. प्रतिबंधित प्लास्टिक संदर्भात येत्या १ जुलैपासून नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकामार्फत बाजारपेठ, दुकाने, आस्थापनांमध्ये तपासणीची धडक मोहिम राबविण्यात येणार आहे. या कारवाईमध्ये प्रतिबंधित प्लास्टिक साहित्याचा वापर, वाहते व साठवणूक आढळल्यास महाराष्ट्र विघटनशील कचरा नियंत्रण कायदा २००६ अंतर्गत महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिसूचना २०१८चे उल्लंघन केल्या प्रकरणी नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
नागपूर शहरातील सर्व दुकाने, बाजारपेठा, आस्थापना, व्यापारी संघटना आदींनी आपल्याकडे उपरोक्त प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा असल्यास त्याबद्दल मनपाला माहिती द्यावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी केले आहे.