यवतमाळ :- अनाथ, एकल पालक, निराश्रित, बेघर व अन्य आपत्तीत सापडलेल्या बालकांचे कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे या हेतूने राज्य शासनाकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविले जाते. या योजनेच्या बालकांचे बॅंक खाते आधारसोबत जोडणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बाल कल्याण समिती आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे या योजनेची अंमलबजावणी करून मोठ्या प्रमाणात बालकांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. शासन स्तरावरून प्राप्त होत असलेला निधी आयुक्तालयस्तरावरून आहरीत करून संबंधित बालकांच्या बँक खात्यावर रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया करण्यात येत होती.
आयुक्तालय स्तरावरून आहरीत केलेला निधी थेट बालकांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सन २०२४-२०२५ पासून सुरु करण्यात आली आहे. यासाठी बालकांच्या बँक आधार लिंक केलेल्या बँक खात्याशी सिडेड करणे महत्वाचे असते. जर ही प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थी बालकांचे बँक खात्याशी आधार कार्ड सिड करून त्याची प्रत जिल्हा बाल संरक्षण कक्ष कार्यालय, यवतमाळ येथे सादर करण्यात यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रभाकर उपरे यांनी केले आहे.