– मनपा आयुक्त डॉ. चौधरी यांनी घेतला सेमिनरी हिल्स ते अंबाझरी येथील कामाचा आढावा
नागपूर :- सेमिनरी हिल्स परिसरातील अतिक्रमण निर्मूलन कार्यवाही तसेच परिसरातील स्वच्छतेबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सक्त निर्देश दिल्यानंतर परिसरातील कार्यवाहीला गती आली आहे. मंगळवारी (ता.२२) मनपा आयुक्तांनी स्वत: परिसरात भेट देउन कार्यवाहीचा आढावा घेतला. त्यांनी सेमिनरी हिल्स येथील अतिक्रमण कार्यवाही ते अंबाझरी टी पॉईंट पर्यंतची स्वच्छता कार्यवाहीची पाहणी केली.
याप्रसंगी उपायुक्त प्रकाश वराडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, झोनल स्वच्छता अधिकारी दीनदयाल टेंभेकर, यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी सेमिनरी हिल्स येथील टिव्ही टॉवर चौक, सीजीओ कॉम्प्लेक्स चौक, एलएडी कॉलेज चौक, वायुसेना नगर चौक या सर्व भागातील अतिक्रमण कार्यवाहीचा आढावा घेतला. रस्त्याच्या लगतचे सर्व अतिक्रमण काढण्यासाठी नागरिकांनी स्वत: पुढाकार घेण्याचे देखील आवाहन त्यांनी केले. सोमवारी (ता.२१) आयुक्त डॉ. चौधरी यांच्या दौ-यानंतर आज मंगळवारी (ता. २२) नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रस्त्यालगत असलेले अतिक्रमण हटविल्याचे दिसून आले. याशिवाय आयुक्तांनी उपरोक्त परिसरासह फुटाळा ते अंबाझरी टी पॉईंट पर्यंतच्या स्वच्छता कार्याचा आढावा घेतला. विभागाद्वारे करण्यात आलेल्या स्वच्छता कार्याप्रति त्यांनी समाधान व्यक्त करून परिसरात नेहमी स्वच्छता कायम राहिल, याकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले.
फुटाळा तलावा लगत भगवान बिरसा मुंडा चौका जवळील भागात कच-याची समस्या असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. परिसरातील नागरिकांद्वारे रस्त्यालगत कचरा टाकण्यात येत असतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी मनपाच्या कचरा गाडीमध्येच कचरा टाकावा यासाठी आयईसी चमूद्वारे परिसरामध्ये जनजागृती करण्यात यावी. तसेच वस्तीमध्ये कचरा गाडी अथवा कर्मचारी जाणे शक्य नसल्याने रस्त्यालगत मोठ्या कचरा पेट्या लावून त्यातच नागरिकांनी कचरा टाकण्याविषयी देखील जनजागृती करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे त्यांनी सूचविले.
अंबाझरी मार्गावरील धरमपेठ झोनच्या कचरा ट्रान्सफर स्टेशनची देखील आयुक्तांनी पाहणी केली. या परिसरामध्ये बाहेरील वाहनातून बांधकाम मलबा व अन्य कचरा आणून टाकला जात असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. मनपाच्या ट्रान्सफर स्टेशन लगत कुठल्याही प्रकारची अस्वच्छता पसरू नये याकरिता संपूर्ण जागेवर रस्त्याच्या लगतपासून लोखंडी जाळी लावण्याचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्देश दिले.