– पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी केली कारवाईची पाहणी मनपा व पोलिस विभागाद्वारे संयुक्त कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध भागात सुरु असलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईला गती देण्यात आली आहे. मनपा आणि पोलिस प्रशासनाद्वारे संयुक्तरित्या सुरु असलेल्या कार्यवाहीमध्ये गुरुवारी (ता. ९) धरमपेठ, धंतोली, गांधीबाग झोनमधील विविध बाजार भागांमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. गांधीबाग झोनमधील कारवाईदरम्यान पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पाहणी केली. त्यांच्या निर्देशानुसार महाल, कल्याणेश्वर मंदिर, बडकस चौक या परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले.
याप्रसंगी पोलिस उपायुक्त अर्चित चांडक, मनपा उपायुक्त प्रकाश वराडे, अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त हरीश राऊत, उपायुक्त व गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उपस्थित होते.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार प्रवर्तन विभागाद्वारे शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण कारवाईला सुरु आहे. गुरुवारी (ता. ९) मनपाच्या प्रवर्तन विभागातर्फे पोलीस विभागाच्या मदतीने अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली. पथकाद्वारे शहरातील गिट्टीखदान, सेमिनरी हिल्स, तेलंखेडी, सीताबर्डी मेन रोड, धंतोली, यशवंत स्टेडियम, महाल, कल्याणेश्वर मंदिर, बडकस चौक या भागामधील अतिक्रमण हटविण्यात आले.
सहायक आयुक्त हरीश राऊत यांच्या मार्गदशनात अतिक्रमण पथक प्रमुख श्री. भास्कर माळवे, श्री शहदाब खान, उपद्रव्य शोध पथक आणि पोलीस प्रशासन यांच्याद्वारे संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली. मनपातर्फे २ जेसीबी, ६ ट्रक लावण्यात आले होते. या कारवाईमध्ये ८ ट्रक माल जप्त करण्यात आला.