बाबासाहेबांच्या संघर्षाचे निवासस्थान दुर्लक्षित : उत्तम शेवडे  

नागपूर :-भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अतिशय संघर्षाच्या काळात 1912 ते 1934 च्या दरम्यान 22 वर्ष ज्या ठिकाणी वास्तव्य केले ते निवासस्थान आजही आंबेडकरी जनतेच्या व चळवळीच्या दृष्टीने प्रेरणा केंद्र असले तरी ते संपूर्ण दुर्लक्षित आहे. अशी माहिती बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी स्वतः भेट दिल्यावर दिल्ली

हे स्थळ दादर पूर्व च्या आंबेडकर मार्गाने दक्षिणेकडे जाताना उजवीकडे असलेल्या परेल च्या प्रसिद्ध दामोदर हॉल शेजारच्या मडकेबुबा चौकात उजवीकडे विठ्ठल चव्हाण रोडवर (गल्ली) बी आय टी चाळ, परळ नावाने प्रसिद्ध आहे. या प्रथम चाळीतील दुसऱ्या माळ्यावरील खोली नंबर 50 व 51 येथे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या उमेदीचा काळ घालवला.

बाबासाहेबांचे वडील रामजी हे इंग्रजाच्या सैन्यात सुभेदार असल्याने इंग्रजांनी कैद्यासाठी बांधलेल्या त्या चाळीतील दोन खोल्या सुभेदारांना वापरण्यासाठी दिल्या होत्या. याच दोन खोल्यात सुभेदार रामजी यांनी आपल्या कुटुंबाचा प्रपंच थाटला होता. येथेच 1913 ला त्यांचे निधन झाले.

ठिकाणाचे महत्त्व

याच ठिकाणी 17 डिसेंबर 1919 ला कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज यांनी बाबासाहेब आंबेडकरांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना मूकनायक हे वृत्तपत्र सुरू करण्यासाठी 2500 रुपयाची आर्थिक देणगी सुद्धा दिली होती.

या ठिकाणी राहूनच बाबासाहेबांनी एम ए, पी एचडी, पासून तर बॅरिस्टर पर्यंतच्या सर्व पदव्या मिळवल्या. येथेच प्राध्यापकाची ड्युटी, हायकोर्टाची वकिली, यशवंत चा जन्म, राजरत्न चा जन्म व मृत्यू, माणगाव परिषद, नागपूरची बहिष्कृत परिषद, मुंबई विधिमंडळावर निवड, महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृति दहन, सायमन कमीशनवर नियुक्ती, नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह, गोलमेज परिषदेचे निमंत्रण, पुणे करार, वडील, भाऊ, बहीण, मुलांचे, निधन आदि सर्व घटनांची साक्ष ही परळ ची बी आय टी चाळ आहे.

जब्बार पटेल निर्मित बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्रपटात शाहू महाराज बाबासाहेबांच्या घरी घोडागाडीने आल्याचा प्रसंग दाखविण्यात आला आहे तो याच ठिकाणचा. यावेळी बाबासाहेब आंबेडकरां सोबत त्यांच्या जीवन संगिनी मातोश्री रमाई यांनी आपली संपूर्ण हयात बाबासाहेबांच्या शिक्षणाच्या व संघर्षाच्या दरम्यान आपल्या परिवाराच्या पालन पोसण्यासाठी घालविली. याच ठिकाणी त्यांच्या मुलांची निधने झाली. फेब्रुवारी 1934 नंतर बाबासाहेबांनी आपला निवास दादर च्या हिंदु कॉलनीतील राजगृहात हलविला, त्यानंतर लगेच 27 मे 1935 ला रमाई चे निधन झाले.

मागील काही वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा निवासस्थान समिती मुंबई -12 च्या माध्यमातून मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते शंकर लोखंडे परेल, दासरी कृष्णमूर्ती वरळी, आकीफ दफेदार, सूर्यकांत खरात, संजय पवार, अमोल निकाळजे, अफरोज मलिक आदी कार्यकर्ते दरवर्षी 4 डिसेंबरला निवासस्थान परिसरात बाबासाहेबांना मानवंदना देण्याचा कार्यक्रम घेतात. दिवसेंदिवस इथे गर्दी वाढत आहे.

मुख्यमंत्र्यांची भेट 

कोविड काळात 6 डिसेंबर 2019 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देऊन घाई गडबडीत राष्ट्रीय स्मारक घोषित केले त्यामुळे शासकीय प्रशासकीय स्तरावर याची चर्चा अधिक होऊ लागली. मागील दोन वर्ष वर्षे कोव्हीड काळात गेल्यामुळे आंबेडकरी अनुयायी मुंबईला जाण्यापासून वंचित राहिले. परंतु यावर्षी लाखोंच्या संख्येने ते मुंबईच्या चैत्यभूमीला, दादरच्या राजगृहाला, आंबेडकर भवनाला व प्रेरणा निवासस्थानाला भेटी देतील.

बाबासाहेबांचे प्रेरणा निवासस्थान दादर रेल्वे स्टेशनच्या पूर्वेस उजवीकडे अर्धा किलोमीटर अंतरावर गोकुलदास पास्ता रोडवर डॉ आंबेडकर भवन, बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस व तिथूनच डॉक्टर आंबेडकर मार्गाने पुढे वीस मिनिटे पायी गेल्यावर मडके बुवा चौकात उजवीकडे परळ चा दामोदर हॉल (जोशी विद्या संकुल) शेजारच्या विठ्ठल चव्हाण रोडवर ही बी आय टी चाळ परळ येथे आहे. येथे दरवर्षी 4 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा निवासस्थान समिती मुंबई च्या माध्यमातून मानवंदना देण्याचा कार्यक्रम नियमित असतो यावर्षी सुध्दा आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उद्या समृद्धी महामार्गाची पाहणी करणार

Sat Dec 3 , 2022
नागपूर :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ११ जानेवारीचा हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा दौरा लक्षात घेता उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर ते शिर्डी पर्यंत महामार्गाची पाहणी करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्या सकाळी नागपूरला आगमन होणार आहे. सकाळी नऊ पंचेचाळीसला त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com