संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- समाजकार्य महाविद्यालय कामठी येथील महिला तक्रार निवारण समिती, कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन फाउंडेशन, दिल्ली, महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था, धरमपेठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गर्ल्स प्रोटेक्शन युतीचे संरक्षण या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी कार्यकारी प्राचार्य डॉ. रुबीना अन्सारी होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाल कल्याण समितीच्या वर्षा पाटील व राणी कळमकर समिती प्रमुख डॉ. प्रणाली पाटील व सदस्य डॉ. सविता चिवंडे मंचावर उपस्थित होते.
सर्वप्रथम डॉ. प्रणाली पाटील यांनी प्रास्ताविक भाषणातून महिला तक्रार निवारण समितीच्या कार्याचा व उद्दिष्टांचा परिचय विद्यार्थिनींना करून दिला. यानंतर वर्षा पाटील व राणी कळमकर या मार्गदर्शकांनी महाविद्यालयातील मुलींसोबत संवाद साधून मुलींच्या लैंगिक छळाच्या संदर्भात सविस्तर माहिती देऊन लैंगिक छळापासून स्वतःची सुरक्षा कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले. अलीकडे मुलीबरोबर मुलेसुद्धा लैंगिक छळाचे बळी पडत आहेत, याविषयीची अनेक उदाहरणे दिली. मुलींनी पुरुषांकडून होणारा नकोसा स्पर्श लवकर ओळखणे आवश्यक आहे असे सांगून युवतींच्या संरक्षणासाठी विविध उपाय योजना सुचविल्या. सोबतच पोक्सो ॲक्ट २०१२, बाल न्याय काळजी आणि संरक्षण कायदा-२०१५ याविषयी विद्यार्थिनींना माहिती दिली. डॉ. रुबीना अन्सारी यांनी सायबर क्राईमबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांना विशेषतः विद्यार्थिनींनी कशा प्रकारे जागरूक राहिले पाहिजे याविषयी विस्तृत विवेचन केले. कार्यशाळेचे संचालन व आभार डॉ. सविता चिवंडे यांनी केले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.