गुणवत्तापूर्ण शिक्षक निवडण्यासाठी पारदर्शक निवड प्रणाली राबवावी – राज्यपाल

– मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ

मुंबई :- विद्यादान हे पवित्र कार्य आहे. महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये गुणवत्तेच्या आधारे शिक्षकांची निवड करण्यासाठी पारदर्शक प्रणाली निर्माण करण्याबाबत आपण आग्रही असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

स्थापनेचे १६८ वे वर्ष साजरे करीत असलेल्या मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृह येथे संपन्न झाला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

शिक्षकांची निवड करताना एक सामायिक परीक्षा देखील घेतली जावी या संदर्भात विचारविनिमय सुरु असल्याचे राज्यपालांनी सांगितले. सर्व विद्यापीठांनी वर्षाच्या सुरुवातीलाच वर्षभराचे शैक्षणिक वेळापत्रक तयार करावे. ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. जून महिन्यापर्यंत निकाल जाहीर करून एक महिन्यात दीक्षांत समारंभ आयोजित करावे जेणेकरून विद्यार्थ्यांना पदवी लगेचच मिळेल असे राज्यपालांनी सांगितले.

महाविद्यालये व विद्यापीठ विभागांमध्ये शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मार्ग काढला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

शिक्षण ही निरंतर प्रक्रिया असून पदवी प्राप्त केल्यानंतर देखील ते आयुष्यभर सुरु असले पाहिजे असे सांगताना विद्यार्थ्यांनी इतरांशी तुलना न करता आपल्या गतीने शिकत राहिले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आरोग्यासाठी व्यायाम व चालणे या सवयी लावून घेतल्या पाहिजे व अमली पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

दीक्षान्त समारंभाला सुरुवातीला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील व कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा हे उपस्थित होते. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर हे समारंभाचे विशेष अतिथी होते. अमेरिकेच्या सेंट लुईस विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. फ्रेड पेस्टेलो, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू डॉ. अजय भामरे, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राचार्य आणि स्नातक उपस्थित होते.

दीक्षान्त समारंभामध्ये १,६४, ४६५ स्नातकांना पदव्या, ४०१ स्नातकांना पी.एचडी. तर १८ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पिंपळगाव (खात) येथे आजपासून ओपन टेनिस (थ्रो) क्रिकेट टूर्नामेंट ला सुरुवात

Wed Jan 8 , 2025
अरोली :- खात वरून जवळच असलेल्या पिंपळगाव /महालगाव नदीच्या काठावरील मैदानावर पिंपळगाव येथील जाणता राजा (आदर्श) क्रिकेट टीमच्या वतीने खास मकर संक्रात व जलसा निमित्य ओपन टेनिस थ्रो क्रिकेट टूर्नामेंट चे आयोजन उद्या 8 जानेवारी बुधवारपासून अंतिम सामन्यापर्यंत सुरू होणार आहे. गावातील ,परिसरातील सामाजिक व राजकीय मंडळीकडून 15000 एक रुपयाच्या प्रथम पुरस्कार, दहा हजार एक रुपयाच्या द्वितीय पुरस्कार, 7001 रुपयाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!