– पाच वर्षाखालील बालकांनी घेतला पोलिओ डोस : अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ
नागपूर :- राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानाअंतर्गत रविवारी ३ मार्च रोजी नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील पोलिओ लसीकरण अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या हस्ते विश्वकर्मा नगर येथील आयुष्मान आरोग्य मंदिर केंद्रावरून अभियानाचा शुभारंभ झाला.
याप्रसंगी आरोग्य उपसंचालक डॉ. कांचन वानेरे, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हेलन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद, नोडल अधिकारी डॉ. मेघा जैतवार, आरसीएच अधिकारी डॉ. बकुल पांडे, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पावने, विश्वकर्मा नगर येथील आयुष्मान आरोग्य मंदिरच्या प्रभारी डॉ. पूजा कंठवार, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, दिपाली नागरे, रोटरी क्लब नागपूर ब्लॅक गोल्डचे एनक्लेव्ह सेक्रेटरी अनिल महल्ले, सचिव अर्चना निनावे, माजी सचिव सचिन निनावे, प्रेसिडेंट इलेक्ट विलास कुरजकर आदी उपस्थित होते.
शहरातील एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहू नये यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे दहाही झोनस्तरावर १२५३ पोलिओ बूथची व्यवस्था करण्यात आली. यासाठी २४७ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली. शहरात २९१६८५ पोलिओ लसींची देखील उपलब्धता करण्यात आली होती. रविवारी ….. बालकांना पोलिओ लस देण्यात आली. सोमवार ४ मार्चपासून पोलिओ लस पासून वंचित राहिलेल्या बालकांच्या घरी जाऊन मनपाद्वारे लस दिली जाणार आहे. या लसीकरण अभियानात पालकांनी सहकार्य करावे.
पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब हे पोलिओला हद्दपार करण्यास अत्यंत आवश्यक आहेत. ५ वर्ष वयाखालील प्रत्येक बाळाला पोलिओ डोस मिळणे हा त्याचा अधिकार आहे. बालकांच्या सुदृढ आरोग्यदायी आयुष्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या बाळाला पोलिओ डोस द्यावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी याप्रसंगी केले.
५ वर्षाखालील एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहू नये, या करीता मनपाच्या आरोग्य विभागाकडून ट्रांझीट टिम तसेच मोबाईल टिम तयार करण्यात आली. मंदिर, मस्जिद, मॉल्स, रेल्वे स्थानक, बस स्थानक, विमानतळ व मोबाईल टिमद्वारे, अतिजोखिमग्रस्त भाग, बांधकाम, विभक्त, भटक्या जमातीचे मुले, रस्त्यावरील मुले, अनाथ आश्रमातील मुलांना पोलिओ डोस पाजण्याची सोय करण्यात आली. तसेच झोपडपट्टी, स्मॉल फॅक्टरी परिसरातील व इतर ठिकाणी देखील पोलिओ डोस पाजण्याची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय बेघर, रस्त्यावरील बालकांकरीता २ चमू तयार करण्यात आल्या होत्या. या चमूंद्वारे बालकांना त्यांच्या ठिकाणी जाऊन डोस देण्यात आले. पोलिओ डोस घेतलेल्या प्रत्येक बालकाच्या करंगळीला शाई लावण्यात आली.