पणजी :- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मी प्रथमच सहभागी झाले आहे. या पहिल्याच प्रयत्नात मला कांस्यपदक मिळाले, ही माझ्या दृष्टीने भावी यशाची पायाभरणीच आहे, असे महाराष्ट्राची कुस्तीगीर भाग्यश्री फंडने सांगितले.
भाग्यश्रीने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कुस्तीच्या ६२ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. गतवर्षी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिला सहभागी होत आले नाही. यंदा मात्र तिला या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत पदक मिळवण्यासाठी तिने भरपूर मेहनत केली होती. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षण शिबीरही आयोजित करण्यात आले होते या शिबिरातही तिला भाग घेण्याची संधी मिळाली त्याचाही फायदा दिला झाला.
भाग्यश्रीचे वडील हनुमंत फंड हेदेखील कुस्तीगीर आहेत. भाग्यश्रीची बहीण धनश्री हीदेखील कुस्तीगीर आहे. त्यामुळे कुस्तीचे बाळकडू तिला घरातूनच मिळाले आहे. तथापि, तिला स्पर्धात्मक प्रशिक्षण मिळावे, या दृष्टीने आळंदी येथील ज्येष्ठ प्रशिक्षक दिनेश गुंड यांच्या जोग महाराज व्यायाम शाळेमध्ये तिला प्रशिक्षणासाठी ठेवण्यात आले.
या व्यायाम शाळेत प्रशिक्षण घेतल्यानंतर तिने स्थानिक स्तरावर चांगले यश मिळवले. आपली धाकटी कन्याही कुस्ती चांगले यश मिळत आहे, हे पाहून तिचे वडील हनुमंत यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील नोकरीचा राजीनामा दिला आणि श्रीगोंदा येथे त्यांनी स्वतः आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र स्थापन केले आहे. या केंद्रामध्ये प्रतीक सातव व समाधान घोडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साधारणपणे ७० ते ८० खेळाडू कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहेत.
२० वर्षीय भाग्यश्रीने आतापर्यंत कनिष्ठ गटाची जागतिक स्पर्धा, जागतिक कॅडेट स्पर्धा व २३ वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा या स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे त्यापैकी कॅडेट स्पर्धेत तिला कांस्यपदक मिळाले होते.
आता वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळवण्याचे भाग्यश्रीचे ध्येय आहे. त्यासाठी भरपूर मेहनत करायची तिची तयारी आहे आणि आई-वडिलांचाही तिला भरपूर पाठिंबा मिळत आहे.