संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असा समाज निर्माण करण्यासाठी सर्वांनी शिका,संघटित व्हा व संघर्ष करा या मूलमंत्राचा वापर करून जीवन व्यतीत करणे गरजेचे आहे.याच मूलमंत्राचा वापर करीत जीवनाशी संघर्ष करून मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत हातमजुरी करणाऱ्या कुटुंबातील आई वडिलानी आपल्या मुलाला वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी आयकर निरीक्षक बनविले. साहिल राजू भुजाडे असे त्याचे नाव असून तो 23 वर्षे वयाचा असून कुंभारे कॉलोनी कामठी येथील रहिवासी आहे.नुकतेच प्रशिक्षण संपविले असून इटारसी येथे आयकर निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
आयकर निरीक्षक साहिल भुजाडे यांच्या संघर्षाची कथा मनाचा ठाव घेणारी आहे. साहिल भुजाडे ची आई प्रतिमा व राजू हे दोघेही मोलमजुरी चे काम करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत मुलांना शिकविले. आई सध्या घरकाम करीत असून वडील कन्हान बुक स्टॉल लावतात.साहिल चा मोठा भाऊ एमपीएससी चे शिक्षण घेत असून साहिल भुजाडे व त्याचा मोठा भाऊ हे दोघेही भाऊ घराजवळील बोधिवृक्ष वाचनालयात सतत अभ्यास करत असायचे.
साहिल ने बि.टेक केल्यानंतर स्पर्धात्मक परिक्षेकडे कल वाढवत घराजवळील बोधिवृक्ष वाचनालयात अभ्यास करणे सुरू केले. इच्छाशक्ती खंबीर असेल आणि स्वप्नांचा पाठलाग करण्याची तयारी असेल तर कोणतेही व्यक्ती सर्वात मोठे ध्येय गाठू शकते.मार्गात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करू शकते.साहिल भुजाडे चे एकदम 23 व्या वर्षात आयकर निरीक्षक ची नोकरी मिळविणे हे त्यातील दुर्दम्य इच्छाशक्तीचे उदाहरण आहे.छोट्या छोट्या गोष्टीसाठी तक्रार करण्याऱ्यासाठी ही एक मोठी शिकवण आहे. घरातील आर्थिकदृष्टया कमकुवत परिस्थितीत साहिल भुजाडे यांनी आयकर निरीक्षक पदी नोकरी मिळविल्याने साहिल चे सर्वत्र कौतुक होत आहे तर याचे श्रेय साहिल भुजाडे हे आपले आई, वडील ,भाऊ व बोधिवृक्ष वाचनालयाला देतात .
साहिल भुजाडेला इतक्या कमी वयात आयकर निरीक्षक पदी नोकरी प्राप्त झाल्याने कामठी शहरासह कुंभारे कॉलोनी चे नाव गाजले सर्वत्र आनंदाचे वातावरण असून साहिल चे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे.साहिल आयकर निरीक्षक पदाचे प्रशिक्षण संपवुन काल सायंकाळी 7 वाजता कामठी ला आले असता साहिल चे कौटुंबिक सदस्य,मित्रमंडळी व स्नेहजनांनी साऊंड सिस्टीम लावून ,नाचत गाजत गुलालाची उधळण करीत स्वागत केले. तर या आनंदाच्या क्षणी साहिलच्या आई वडिलांचे डोळे आनंदाचे अश्रूने पाणावले होते.