संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 19 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी नागपूर महामार्गावरील प्रबुद्ध नगर मार्गावर ट्रकटिप्पर ने दुचाकीला दिलेल्या धडकेत घडलेल्या गंभीर अपघातातून दुचाकीवर वडिलांसोबत बसलेल्या सात वर्षीय मुलाचा बापासमोरच दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याची घटना काल (शुक्रवारी)रात्री साडे दहा दरम्यान घडली असून मृतक बालकाचे नाव जियान सुलतान अहमद रा लकडगंज कामठी असे आहे तर या अपघातात बचावलेल्या वडीलाचे नाव सुलतान अहमद मो जफरुद्दीन वय 40 वर्षे रा लकडगंज कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक जियान व त्याचे वडील सुलतान अहमद हे वारीसपुरा कामठी येथील आपल्या आजीच्या घरुन रात्रीचे जेवण आटोपून बजाज दुचाकी क्र एम एच 31 बी सी 2212 ने डबलसीट लकडगंज येथील राहत्या घरी जात असता कामठीहुन नागपूर कडे भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या बाराचाकी ट्रक टिप्पर क्र एम एच 40 बी एल 2061 ने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीचालक पायाच्या डाव्या बाजूने पडले तर मागे बसलेला सात वर्षीय जियान हा ट्रकखाली आल्याने रक्तबंबाळ होऊन जागीच मृत्यू पावल्याची घटना घडल्याने सर्वत्र एकच शोककळा पसरली तर बापासमोरच मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने बापाला एकच धक्का बसला .
सदर घटनेची माहिती हवेसारखी पोहोचताच नागरिकानी त्वरित घटनास्थळ गाठून एकच जमाव केला.दरम्यान या जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना शर्तीचे प्रयत्न करावे लागले .अखेर आरोपी ट्रक चालक रामप्रसाद कैथल वय 41 वर्षे रा वलनी खदान खापरखेडा विरुद्ध भादवी कलम 279,337,304(अ)427,184 आर डब्लू 134,177 अनव्ये गुन्हा दाखल करून अटकेत घेतले.तसेच घटनास्थळाहून ट्रक व दुचाकी जप्त करण्यात आले तसेच पुढील उत्तरिय तपासणीसाठी मृतदेह नजीकच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.मृतकाच्या पाठीमागे कुटुंबात आई , वडील व दोन बहिणी असा आप्तपरिवार आहे.या घटनेने लकडगंज परिसरात शोककळा पसरली आहे.