नागपूर :-नागपूर विद्यापीठात पेट परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना गाईड अभावी पीएचडी करणे अशक्य झाल्याने पेट परीक्षा पास विद्यार्थी कुलगुरूंची (VC) भेट घेणार असून सोबतच विधिमंडळावर मोर्चा सुद्धा काढणार असा ठराव पेट परीक्षा पास विद्यार्थ्यांनी काल घेतला.
मागील एक वर्षा पूर्वीपासून पेट (PET) परीक्षा पास असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना नागपूरच्या रा तू म विद्यापीठाने गाईड उपलब्ध करून दिला नाही. यापूर्वी 4 ऑक्टोबर 21, 18 नोव्हेंबर 21 व 9 जून 2022 रोजी निवेदने देऊन सुद्धा विद्यापीठाने त्यावर काहीही निर्णय घेतलेला नाही.
त्यामुळे यावर्षी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जैसे थे स्थिती असल्याने विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य विधिमंडळावर मोर्चा काढण्याचा कठोर निर्णय घेतला. काल डॉ आंबेडकर सांस्कृतिक भवन उर्वेला कॉलनी येथे बुद्धिस्ट स्टुडन्ट असोसिएशन द्वारे पेट परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी बुद्धिस्ट स्टुडंट्स असोसिएशनचे अध्यक्ष माजी नागपूर विभागीय माहिती सहसंचालक भिक्खू महेंद्र कौसल होते. बैठकीचे सूत्रसंचालन असोसिएशनचे सचिव उत्तम शेवडे यांनी केले.
नागपूर विद्यापीठातील डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारधारा, बौद्ध अध्ययन, पाली विषयात तसेच कायदा विषयात पी एचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गाईडची समस्या मोठ्या प्रमाणात असल्याची चर्चा यावेळी विशेषत्वाने करण्यात आली.
याप्रसंगी मानव अधिकार संरक्षण मंच चे आशिष फुलझेले, ऍड माणिकराव सावंग, ऍड सागर गणवीर, राहुल शाक्यसिंह, आकाश खोब्रागडे, अंकित नंदा, ऍड रामभाऊ उमरे, किशोर भैसारे, सिद्धार्थ फोपरे, मोरेश्वर मंडपे, सुमित्रा निकोसे, निखिल बागडे, सचिन देव, अंकित थुल, जगन्नाथ पोहेकर, एस पी फुलझेले, मीथीला फोपरे, संदीप वाघमारे, नंदकिशोर पाटील, राहुल ठाकरे, अपेक्षा शामकुवर, आशिष खोब्रागडे आदि नेट पास झालेले व नेटची तयारी करीत असलेले प्रमुख विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.