संदीप बलविर, प्रतिनिधी
– मुख्याधिकाऱ्यांना हटवा, नागरपरिषदेला वाचवा ची मागणी
– नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी हनुमान नगरच्या विकासाचे दिले वचन
नागपूर :- हनुमान नगर वासीयांना हक्काचे घर मिळावे म्हणून पट्टे वाटपाचा ठराव २७ ऑक्टोबर २०२१ ला नगरपरिषदेने मंजूर करून देखील त्याचा वरिष्ठांकडे पाठपुरावा न केल्याने नाराज हनुमान नगर वासियांनी क्रांती चौकापासून बुटीबोरी नगरपरिषदेवर मोर्चा काढला. मालकी हक्काच्या पट्ट्यासाठी गेले दोन वर्ष हनुमान नगर वाशी आंदोलन करत आहेत. त्याचबरोबर रेल्वेच्या कामामुळे बुटीबोरी कडून हनुमान नगर कडे येण्यासाठी रहिवाशांना प्रचंड कसरत करावी लागत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच पाण्याची समस्या जाणवायला लागली. या सर्व पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला.यावेळी हनुमान नगर वाशी यांनी मालकी पट्ट्यांची मागणी करणारे २२० अर्ज नगराध्यक्षांना सादर केले.
यावेळी नगराध्यक्ष बबलू गौतम हे स्वतः मोर्चाला समोरे जाऊन निवेदन स्वीकारले. हनुमान नगरच्या विकासाबाबत त्यांनी प्रतिबद्धता जाहीर केली. व मंजूर तसेच विचाराधीन असणारी कामे जनतेपुढे मांडली. त्यातून काही प्रश्न ताबडतोब सुटण्याची आशा निर्माण झाली.
त्याआधी मोर्चेकर्यांना संबोधित करताना किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण लाटकर यांनी नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे हनुमान नगर वासी अनेक शासकीय योजनांपासून वंचित असल्याचे आणि त्यामुळे मोदी सरकारची बेघरांना घरे देण्याच्या योजनेला खिळ बसत असल्याचे सांगितले. त्यांनी ठासून मागणी केली की घराचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेत समाविष्ट झाला पाहिजे. मोर्चेकरांना कैलास मडावी व भीमराव वानखेडे यांनी देखील संबोधित केले.
यावेळी मोर्चामध्ये गणेश इचकाटे, मारुती नेवारे, विजय मडावी, देवानंद चौधरी, विजय वरखडे, युवराज गाते, सुनील घागरे, प्रशांत पाजारे,राजू टेकाम, सुधीर मडावी, मंगेश मुंगबाते, शंकर पांगुळ,कृष्णा केचे, जास्वंदा चव्हाण, नीता मडावी, वत्सला मडावी, कल्पना बावनकर,माधुरी राऊत,वंदना नेवारे, रंजना कानफाटे, रेखा ठाकरे, मनीषा नेवारे सह शेकडो लोक सहभागी झाले होते.