-श्वान मार्शलकडून कुठलाच ईशारा नाही
– नागपूर रेल्वे स्थानकावरील सायंकाळचा प्रकार
नागपूर :-एका बेवारस बॅगने प्रचंड खळबळ उडाली. लगेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानाने कुठल्याही प्रकारचा घातपात असण्याचा ईशारा दिला नाही. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी बॅग ताब्यात घेतली. हा प्रकार बुधवार 5 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर घडला.
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू दोन दिवसीय नागपूर दौर्यावर आहेत. त्यानिमित्त शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. त्याच अनुषंगाने नागपूर रेल्वे स्थानकावरही बॉम्ब शोध व नाशक पथक, श्वान पथक गस्तीवर आहे. दरम्यान पश्चिमेच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ एक जांभळया रंगाची ट्राली बॅग होती. बर्याच वेळपासून बॅगचा मालकही आला नव्हता. ही बाब लोहमार्ग पोलिस शिपाई वीणा भलावी आणि श्रध्दा तिवारी यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच श्वान पथकाला सूचना दिली.
त्याच वेळी श्वान पथक स्टेशनवर तपासणी करीत होते. काही वेळातच एएसआय नरेंद्र मौंडेकर, पोलिस हवालदार रवींद्र बांते, श्वान हस्तक उदय नागपूरे आणि निलय कोरे यांनी धाव घेतली. मेटल डिटेक्टरने तपासणी करण्यात आली तसेच श्वान मार्शल बॅग जवळ गेला. मात्र, घातपात वस्तु असण्याचा कुठलाच ईशारा त्याने दिला नाही, त्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी बॅग ताब्यात घेतली. बॅग उघडली असता त्यात कपडे अणि आधार कार्ड मिळाला. त्यावर गड्डम प्रभाकर असे नाव आहे. भलावी यांनी आधार कार्डवरील मोबाईल नंबरने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होवू शकला नाही. त्यामुळे बॅग जमा करण्यात येईल.