जमिनीशी नाळ असलेले राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपले! खा. गिरीश बापट यांना देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई :- “भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने जमिनीशी नाळ असलेले राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. विकास हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता”, अशी शोकसंवेदना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या शोकसंदेशात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. देशाच्या सार्वभौम सभागृहातील त्यांचा खासदार म्हणून प्रवेश हा तळागाळातून होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री आणि नंतर ते खासदार झाले. 2014 ते 2019 या कार्यकाळात ते संसदीय कामकाज मंत्री होते. त्यांचा हजरजबाबीपणा आणि सर्व पक्षांत समन्वय, यामुळे कोणताही प्रसंग आला तरी योग्य मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती. पुण्याच्या समग्र विकासाचे चिंतन करीत असतानाच कामगार आणि शेतकरी हे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत असताना अमरावती जिल्ह्यात त्यांनी शेती सुद्धा केली. प्रत्येक कामात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या उभारणी करणाऱ्या नेत्यांमध्ये ते अग्रणी होते. जनतेचे त्यांना भरभरुन प्रेम मिळाले.

पुण्याच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. या आजारालाही त्यांनी लढवय्यासारखी झुंज दिली. यातून ते बाहेर येतील, अशी आशा होती. पण, आज ते आपल्याला सोडून गेले. आजारी असतानासुद्धा सातत्याने मतदारसंघावर त्यांचे लक्ष असायचे. त्यांचे निधन ही भारतीय जनता पक्षाची अपरिमित हानी आहे. एक उत्तम संसदपटू, उत्तम वक्ते आपल्यातून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय आणि सर्व कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदनेत म्हटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राजकारणातील मित्रत्व जोपासणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले, राधाकृष्ण विखे पाटील यांची श्रद्धांजली

Wed Mar 29 , 2023
मुंबई, दि. 29 : “भाजपचे नेते आणि खासदार गिरीष बापट यांच्या निधनाने राजकारणातील मित्रत्व जोपासाणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले” अशी भावना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. आपल्या शोकसंदेशात मंत्री विखे पाटील म्हणाले की, गेली अनेक वर्षे विधिमंडळात त्यांचा सहवास लाभला. विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना त्यावेळी बापट संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम पाहायचे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com