नागपूर :- वीज बिलाची थकबाकी वसुली करणाऱ्या महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यास मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना घडली असून या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी प्रथम अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. परंतु नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके व अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. त्यानंतर आरोपी निलेश लहुजी नागपुरे याच्या विरुद्ध पोलिसांनी भादंवि कलम ३५३,३३२,५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
महाल विभाग अंतर्गत जुनी शुक्रवारी वितरण केंद्र येथे कार्यरत महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञ दीपाली केवल खोब्रागडे या तुळशीबाग रोडवरील माळवी सुवर्णकार मंदिराजवळ राहणाऱ्या शंकर बाळाजी किरणापुरे या ग्राहकाकडील वीज बिलाची थकबाकी वसुली साठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी वीज बिलाची थकबाकी न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, असे ग्राहकास सांगितले.त्यावर ग्राहकाने आपण वीज बिल भरले असे म्हटले. त्यामुळे खोब्रागडे यांनी ग्राहकास वीज बिल भरल्याची पावती दाखविण्याची वारंवार विनंती केली.मात्र पावती न दाखवता निलेश लहुजी किरणापुरे याने दीपाली खोब्रागडे यांच्याशी वाद घालून त्यांना शिवीगाळ केली.तसेच दीपाली खोब्रागडे या वीज मीटरकडे जात असताना आरोपी निलेश लहुजी किरणापुरेने त्यांना हात पकडून खाली ओढले व त्यांचे डोके जोरात भिंतीवर आपटले.त्यामुळे दीपाली खोब्रागडे यांच्या डोक्याला जबर मार लागला.
ही घटना १६ सप्टेंबरला दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली. घटना घडल्यानंतर दीपाली खोब्रागडे यांच्या तक्रारीवरून नागपूर शहर कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये प्रथम आरोपी निलेश लहुजी किरणापुरे याच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके व नागपूर शहर मंडलचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली व शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचे प्रकरण गंभीर असून त्याची दखल घेण्याची विनंती केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यावर तातडीने कार्यवाही केली. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी आरोपी निलेश लहुजी नागपुरे याच्या विरुद्ध २१ सप्टेंबरला भादंवि कलम ३५३,३३२,५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.