नागपूर :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील कल्याणकारी राज्याची संकल्पना पूर्णत्वास नेणारा अर्थसंकल्प महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केल्याची प्रतिक्रीया माजी महापौर संदीप जोशी यांनी दिली आहे. युवक, महिला, गरीब आणि अन्नदाता या चार प्रमुख घटकांच्या विकासासाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी राज्य सरकारने केल्याचेही त्यांनी नमूद केले.
यासोबतच विदर्भातील गोसेखुर्द येथे जलपर्यटन प्रकल्पाचा विकास, विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी २ हजार कोटी रुपयांची तरतूद, शेतक-यांसाठी ‘मागेल त्याला सौर कृषि पंप’ या नव्या योजनेसह मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वनविकास योजना, ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यास मान्यता अशा कल्याणकारी योजनांनी शेतकरी आणि विदर्भाच्या बळकटीकरणासाठी विशेष पुढाकार घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संदीप जोशी यांनी आभारही मानले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर मातंग समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी ‘अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था’ (ARTI) ची स्थापना करण्याचा निर्णय हा ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण असल्याचेही मत संदीप जोशी यांनी व्यक्त केले. नागपुरातील विभागीय क्रीडा संकुलाला राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा प्रदान करुन नागपूर आणि विदर्भातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाला गती देण्याचे काम सरकारने केले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे ५० हजार नवीन रोजगाराची निर्मिती व महिला उद्योजकांना प्राधान्य देण्याचे महत्वाचे कार्य करण्यात आल्याचे देखील माजी महापौर संदीप जोशी म्हणाले.