मुंबई :- राज्यात सध्या थंडीचा जोर चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यातील तापमान 10 अंशांच्या खाली नोंदवण्यात येत आहे. मुंबईसह उपनगरातही थंडीची तीव्रता वाढत चालली आहे. मुंबईत आज किमान तापमान १८.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. मुंबईतील हे तापमान गेल्या दहा वर्षांतील नोव्हेंबर महिन्यातील सर्वात कमी तापमान आहे. सध्या या गुलाबी थंडीचा मुंबईकर आनंद घेत आहेत.
मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण तसेच पश्चिम उपनगरात गारठा वाढला आहे. मुंबईत बहुतांश ठिकाणी 16 अंशापेक्षा कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी तर तापमानात आणखी घट झाली आहे. तर कुलाब्यात 20 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. मुंबईतील थंडीची तीव्रता पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. सध्या मुंबईत सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. मुंबईतील दृष्यमानताही कमी झाली आहे.
मुंबईत यापूर्वी २०१६ मध्ये नोव्हेंबरमध्ये १६.३ अंश सेल्सिअस हे सर्वात कमी तापमान नोंदवले गेले होते. मुंबईत पुढील दोन दिवस तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत दिवसभराचे तापमान सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे मुंबईकरांसाठी दुपारही आल्हाददायक ठरत आहे. आजही मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३ अंश आणि १८ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
थंडी वाढण्याचे कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या उत्तर दिशेकडून थंड वारे वाहत आहेत. या वाऱ्यांमुळे वेळेआधीच थंडी महाराष्ट्रात दाखल झाली आहे. त्यातच बंगालच्या उपसागरात ३ डिसेंबरनंतर वातावरण बदलणार आहे. त्यानंतर थंडी कमी होण्याची शक्यता आहे. शनिवारपासून बंगालच्या उपसागरामध्ये दबाव निर्माण होईल आणि वातावरण गरम होईल. त्यामुळे मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
महाबळेश्वर, लोणावळ्यापेक्षा पुण्यात कमी तापमान
सध्या महाबळेश्वर, लोणावळ्यापेक्षा पुण्यातील कमी तापमान नोंदवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात थंडीचा जोर वाढला आहे. महाबळेश्वर आणि लोणावळा ही थंड हवेची ठिकाणे म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र, सध्या तेथील तापमानापेक्षा पुण्यातील तापमान कमी आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार शुक्रवारी पुण्यात ९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, महाबळेश्वर येथे १०.५, लोणावळा येथे १७.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. लोणावळा आणि महाबळेश्वर थंड हवेची ठिकाणे म्हणून प्रसिद्ध असली, तरी पुण्यातील तापमान लोणावळा आणि महाबळेश्वरपेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे.