नागपूर :- अ.भा.माळी महासंघ आणि विविध संघटना यांनी भाजपचे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा मतदार संघातून प्रचंड मताने निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार चंदू उर्फ उमेश यावलकर यांना राज्याच्या मंत्रीमंडळात सहभागी करावे अशी मागणी आजच्या पत्रकार परिषदे मधून करण्यात आली. राज्यात माळी समाज हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. करीता राज्यात निवडून आलेल्या माळी उमेदवारांना मंत्री मंडळात घेण्यासाठी अ.भा.माळी महासंघ आग्रही आहे. विदर्भात माळी समाजाची संख्या पन्नास लाखापेक्षा अधिक आहे. असे असतांना भाजपने उमेदवारी दिलेले माळी समाजातील विदर्भातील एकमेव आमदार उमेश यावलकर मोर्शी मतदार संघातून निवडून आले असल्याची माहिती अ.भा. माळी महासंघांचे राष्ट्रीय विश्वस्त गोविंद वैराळे यांनी पत्र परिषदे मध्ये दिली. आमदार उमेश यावलकर हे उच्च शिक्षित असून त्यांच्या घराण्याला साठ वर्षापासून सामाजिक व राजकीय वारसा लाभला आहे. माळी समाजाच्या विविध संघटनाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन देऊन आ. उमेश यावलकर यांना मंत्रीमंडळात घ्यावे अशी मागणी केली असल्याचे महासंघांचे राज्य वकील आघाडीचे अध्यक्ष ऍड.नंदेश अंबाडकर यांनी सांगितले. पत्र परिषदेत अ.भा. माळी महासंघांचे विभागीय अध्यक्ष कैलास ताणकर, महानगर अध्यक्ष मधुसूदन देशमुख, सरचिटणीस शिवराम गुरनुले, क्रांती ज्योती ब्रिगेड संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रभाकरराव वानखडे, सुभाष मालपे, पंजाबराव फरकाडे, किरण खवले, माळी विकास संस्थेचे उपाध्यक्ष कैलास जामगडे आदी उपस्थित होते.