– अवॉर्ड लेटर मिळाले पैसे मिळाले नाही
– रक्कम जमा करण्याचे सचिवाचे आश्वासन
नागपूर :- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बार्टी) च्या वतीने अनुसूचित जातीच्या पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना देण्यात येणारी फेलोशिप मागील अडीच वर्षापासून मिळाली नाही.
विद्यार्थ्यांनी दोन वर्ष आंदोलन केल्यावर 10 सप्टेंबर 2024 रोजी मंजूर करण्यात आली. 22 ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांना अवार्ड लेटर देण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधनाची सर्व कागदपत्रे (प्रगती अहवाल) बार्टी कार्यालयाकडे जमा केली.
आधीच अडीच वर्षे व आत्ता दोन महिने होऊनही विद्यार्थ्यांच्या खात्यावर एकही पैसा जमा झाला नाही. त्यामुळे आज सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव विजय शिला बाळकृष्ण वाघमारे यांची बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समिती 2022 च्या संशोधक विद्यार्थ्यांनी भेट घेउन विद्यार्थ्यांच्या खात्यावर फेलोशिप ची रक्कम जमा करण्याची विनंती केली.
त्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या मुख्य सचिव महोदयांनी शिष्टमंडळाला एक आठवड्यात खात्यावर रक्कम जमा होण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात अंकित राऊत, उत्तम शेवडे, मिलिंद सुखदेवे, नितीन गायकवाड, पल्लवी कोटंबे, विजया नगराळे, सरला पानतावणे आदि संशोधक विद्यार्थ्यांचा समावेश होता.