हिवाळी अधिवेशनात 20 विधेयके मांडण्यात येणार,महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर :- राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला असून यामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू झाला आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने विविध संसदीय आयुधांचा वापर करून उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर चर्चा करून राज्याच्या व जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. हिवाळी अधिवेशनात एकूण 20 विधेयके मांडण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रामगिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित मंत्रिपरिषद बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हिवाळी अधिवेशन आहे आणि थंडी देखील आहे. त्यामुळे या अधिवेशनामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला ऊब मिळेल आणि ऊर्जा मिळेल, अशा प्रकारचा कारभार करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू. महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाला आणि विशेषतः विदर्भात अधिवेशन चालू असल्यामुळे विदर्भाच्या जनतेला देखील दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा, पुरवणी मागण्यांवर चर्चा, सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा असे कामकाज होणार असून त्यासोबत जवळपास वीस विधयेके मांडण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने महाराष्ट्राकरिता मतदान केले आहे, म्हणून आमचे सरकार हे ‘ईव्हीएम’ सरकार आहे, पण त्या ईव्हीएमचा अर्थ ‘एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र’ असा आहे. आम्ही मॅग्नेटिक महाराष्ट्र घडविण्याकरिता या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे कामकाज करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सोयाबीनच्या खरेदीमध्ये यावर्षी आपण गेल्या पंधरा वर्षाचे रेकॉर्ड तोडले आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे. मागच्या वर्षी सोयाबीन आणि कापसासाठी भावांतर योजना राबवून बाजारभाव व हमीभाव यातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली. तसेच धानाच्या शेतकऱ्याला हेक्टरी 20 हजार रुपये दिले. हे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहणारे शासन आहे, असेही त्यांनी सांगितले.

परभणीमधील घटना ही एका मनोरुग्णामुळे घडली असून मनोरुग्णाच्या कृत्यावर कोणतेही असंविधानिक उद्रेक करणे योग्य नाही. हे शासन संविधानाचा सर्वोच्च सन्मान करणारे आहे. संविधानाच्या बाहेर तसूभरही वेगळे काम करणार नाही. आमचे सरकार संविधानाचा गौरव करणारे आहे. बीड जिल्ह्यातील घटनेची विशेष एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येणार असून आरोपी कोणीही असले तरी त्यांना सोडले जाणार नाही. अशा घटना महाराष्ट्रात गांभीर्यानेच घेतल्या जातात व यापुढेही घेतल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

मिशन समृद्ध महाराष्ट्र’साठी काम करणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही गेली अडीच वर्षे टीम म्हणून काम केले आहे. आता आमची जबाबदारी वाढलेली आहे. जनतेच्या प्रति आम्ही उत्तरदायी आहोत. ‘मिशन समृद्ध महाराष्ट्र’ हे उद्दिष्ट ठेवून काम करणार आहोत. शेतकऱ्यांच्या, जनतेच्या हिताचे प्रकल्प सुरू करून त्यांना चालना दिली. एकीकडे विकास आणि दुसरीकडे लोककल्याणकारी योजना यांची सांगड घातली. लोकाभिमुख आणि गतिमान शासन आणून यापुढेही गतिमानतेने निर्णय घेऊ. या पुढील काळात सर्वसामान्य जनतेसाठी व राज्याच्या विकासासाठी काम करणार आहोत. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्यास महाराष्ट्र शासन हातभार लावणार आहे.

जनतेच्या विश्वासाला पात्र राहून सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करणार – अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जनतेने जो विश्वास आमच्यावर टाकला आहे, त्याला पात्र राहून महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न चर्चेला आले तर त्यावर निश्चितपणे उत्तर दिले जाईल. विरोधकांचा योग्य सन्मान ठेवला जाईल.

मंत्रीमंडळ बैठकीपू्र्वी झालेल्या चहापान कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नवनियुक्त मंत्री, विधीमंडळ सदस्य उपस्थित होते.

*हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार 20 विधेयके*

राज्य विधानमंडळाच्या सन 2024 च्या चौथ्या अधिवेशनात 14 अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवून त्याचे विधेयकामध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. तसेच 6 नवीन विधेयके मांडण्यात येणार आहेत. एकूण 20 विधेयकांवर विचार करण्यात येणार आहे.

*विधेयकात रूपांतरित होणारे अध्यादेश:-*

(१) सन २०२४ चे वि.स.वि.क्र… महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०२४ (नगर विकास विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. ५ चे रुपांतरीत विधेयक) अप्रत्यक्षपणे निवडलेल्या नगर पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचा पदावधी पाच वर्षे करणे,

(२) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध (सुधारणा) विधेयक, २०२४ (सामान्य प्रशासन विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. ६ चे रुपांतरीत विधेयक) (सर्वसाधारण बदलीसाठीच्या कालावधी ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याची तरतूद)

(३) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन) (सुधारणा, विधेयक, २०२४. (महसूल व वन विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. ७ चे रुपांतरीत विधेयक) (दंडाच्या कमाल मर्यादेत वाढ)

(४) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. हैद्राबाद इनामे व रोख अनुदाने रदद् करण्याबाबत (सुधारणा) विधेयक, २०२४ (महसूल व वन विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. ८ चे रुपांतरीत विधेयक) (अनधिकृत हस्तांतरण नियमित करणेबाबत)

(५) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अध्यादेश, २०२४ (वित्त विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. ९ चे रुपांतरीत विधेयक) (केंद्रीय अधिनियमाच्या अनुषंगाने सुसंगत सुधारणा करणे)

(६) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. … महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष (सुधारणा) विधेयक, २०२४ (पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १० चे रुपांतरीत विधेयक) (अपराधांच्या शिक्षेत वाढ अधिनियमाच्या तरतुदीच्या उल्लंघनाबद्दल कडक शिक्षा व दंड वाढविण्याबाबत)

(७) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विवक्षित जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांच्या विषय समित्यांचे सभापती आणि विवक्षित पंचायत समित्यांचे सभापती व उप सभापती पदांच्या निवडणुका तात्पुरत्या ढकलणे विधेयक, २०२४ (ग्रामविकास विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. ११ चे रुपांतरीत वि (जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापती इत्यादी पदांच्या निवडणूका पुढे ढकलणे

(८) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा) विधेयक, २०२४ (महसूल व वनविभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १२ चे रुपांतरीत विधेयक) (शासनाचा महसूल वाढविण्याच्या दृष्टीने अनुसूची एकच्या अनुच्छेदामध्ये सुधारणा करणेबाबत)

(९) सन २०२४ चे वि.प.वि.क्र… महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये (सुधारणा) विधेयक, २०२४ (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १३ चे रुपांतरीत विधेयक) (वाचन संस्कृतीचा व ग्रंथालय चळवळीचा विकास करण्यासाठी अधिनियमाच्या विवक्षीत कलमांमध्ये सुधारणा करणेबाबत)

(१०) सन २०२४ चे वि.स.वि.क्र… महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत (सुधारणा) विधेयक, २०२४ (महसूल व वन विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १४ चे रुपांतरीत विधेयक) (जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजनाचे नियमाधीकरण करण्यास परवानगी देणे आणि नियमाधीकरण अधिमुल्य कमी करुन बाजारमुल्याच्या ५ टक्के इतके निश्चित करणे)

(११) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. .. श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर विश्वस्तव्यवस्था (प्रभादेवी,

(सुधारणा) विधेयक, २०२४ (विधि व न्याय विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १५ चे रुपांतरीत विधेयक) (विश्वस्थ समितीचा कार्यकाळ आणि समिती सदस्यांची संख्या वाढविणे)

(१२) सन २०२४ चे वि.प.वि.क्र… महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०२४ (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १६ चे रुपांतरीत विधेयक) (समुह विद्यापीठ घटित करणेच्या तरतुदीमध्ये सुधारणा)

(१३) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा, विधेयक, २०२४( उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १७ चे रुपांतरीत विधेयक) (नविन महाविद्यालय उघडण्यासाठी इरादापत्र मागविण्यासाठी कालावधी वाढवून देणेबाबत)

(१४) सन २०२४ चे वि.प.वि.क्र. .. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ दुसरी सुधारणा, विधेयक, २०२४ (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १८ चे रुपांतरीत विधेयक)

*प्रस्तावित विधेयके:-*

(१) सन २०२४ चे वि.प.वि.क्र… महाराष्ट्र खाजगी विद्यापीठं दुसरी सुधारणा, विधेयक, २०२४ (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

(२) सन २०२४ चे वि.स.वि.क्र… महाराष्ट्र कारागृह व सुधारसेवा विधेयक, २०२४ (गृह विभाग)

(३) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. (महसूल विभाग) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता (सुधारणा) विधेयक, २०२४

(४) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. हैदराबाद अतियात चौकशी (सुधारणा) विधेयक, २०२४ (महसूल विभाग)

(५) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. विधेयक, २०२४ (महसूल विभाग) महाराष्ट्र शेतजमीन (जमिन धारणेची कमाल मर्यादा) (सुधारणा)

(६) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक, २०२४ (वित्त विभाग)

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Cabinet Meeting Concludes on Eve of Winter Session of Legislature

Mon Dec 16 , 2024
Nagpur :- A meeting of the State Council of Ministers was held today under the chairmanship of Chief Minister Devendra Fadnavis on the eve of the Winter Session of Maharashtra Legislature. The meeting took place at Chief Minister’s official residence ‘Ramgiri’. Deputy Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Ajit Pawar, along with newly appointed Cabinet Ministers and Ministers of […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!