– राहुल नार्वेकर यांच्या रूपाने कायद्याच उत्तम ज्ञान असणारे अध्यक्ष सभागृहाला मिळाले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई :- सभागृहातील योग्य वर्तन आणि शिस्त ही लोकशाहीचा आत्मा आहे. शिस्तशीर आणि वक्तशीर या बाबी लोकप्रतिनिधींना आवश्यक बाबी ॲड.राहुल नार्वेकर यांच्याकडे आहेत. संवादातून चर्चेतून लोकशाही समृद्ध होत असते. राज्यातील जनतेला न्याय देण्याच काम सभागृह करीत असते. सभागृहाच्या अध्यक्षांना कायद्याचे अधिक बारकावे माहीत आहेत.ॲड. राहुल नार्वेकर यांच्या रूपाने कायद्याच उत्तम ज्ञान असणारे अध्यक्ष सभागृहाला मिळाले असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
विधानसभेच्या अध्यक्षपदी निवडीबदल मुख्यमंत्री फडणवीस अभिनंदनपर प्रस्तावावर बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुन्हा अध्यक्ष होण्याचा मान आतापर्यंत चारच जणांना मिळाला आहे. यामध्ये ॲड.नार्वेकर यांना हा बहुमान मिळाला आहे. विधानसभा अध्यक्षांचे दालन सभागृहातील सर्व पक्षासाठी हक्काचे दालन असते. सभागृहात कितीही भांडण झाले तरी हक्काने अध्यक्षांकडे जाता येते. अध्यक्ष दोन्ही बाजूचे ऐकतात. यावेळीही अध्यक्षांकडे ही जबाबदारी आहे. लोकशाहीत चांगला विरोधी पक्ष असणे हे सृदृढ लोकशाहीचे लक्षण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या विधिमंडळात जनसामान्यांच्या प्रश्नांवर अधिक चर्चा होऊन लोकशाही अधिक सदृढ होईल. राज्यातील जनतेला न्याय देण्याचे काम या सभागृहात होत असते.सभागृहातील सदस्य आणि कार्यपद्धती महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याचे काम करतात. या सभागृहातील परंपरांचे मान, सन्मान निश्चितपणे कायम राहील. या पुढील काळात नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यकाळात सभागृहातून व्यापक जनहिताचे निर्णय होतील. विधिमंडळाच्या प्रथा परंपरा यांची उंची राखत सर्व सदस्यांना न्याय देण्याची भूमिका अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी त्यांच्या मागील अडीच वर्षाच्या काळात प्रामाणिकपणे पार पाडली आहेत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भूमिका समन्यायी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विधानसभेच्या सभागृहात प्रत्येक घटकाला समान न्याय देतानाच सामजिक समतोल राखत समन्यायी भूमिका घेवून विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची कामकाजाची हातोटी आहे. सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान होण्याचा त्यांना मान मिळाला आहे. त्यांचे नाव विधीमंडळाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहीले जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.
विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडीबदल उपमुख्यमंत्री शिंदे अभिनंदनपर प्रस्तावावर बोलत होते. ॲड.नार्वेकर यांचे विधानसभा अध्यक्ष म्हणून कामकाज कौतुकास्पद आहे. गेल्या अडीच वर्षात त्यांनी चांगले काम केले हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. गेल्या अडीच वर्षात त्यांनी सखोल अभ्यास करून राज्याच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय दिले आहेत. त्यांनी अध्यक्षपदाची उंची अधिक वाढवली आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर देशाचा, राज्याचा कारभार चालतो. सर्वसामान्य व्यक्ती संविधानामुळे पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होवू शकतो. राज्यात आता विकासाचे व प्रगतीचे नवे पर्व सुरु झाले आहे. अध्यक्षांच्या कायद्याच्या ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यास होईल. त्यामुळे या सभागृहाचे पावित्र्य राखत राज्याला विकासाच्या महामार्गावर नेण्यास सर्वांनी प्रयत्न करूया असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सभागृहात सांगितले.
महाराष्ट्र विधिमंडळाचे सभागृह हे देशाला दिशा देणारे सभागृह
उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा अध्यक्षांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना म्हणाले, महाराष्ट्र विधिमंडळाचे सभागृह हे देशाला दिशा देणारे सभागृह आहे. या सभागृहाची गरिमा सर्वांनी राखली पाहिजे. या सभागृहाला चांगला अध्यक्ष लाभला असल्याने त्यांच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात लोकहितकारी व परिणामकारक निर्णय होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला
कायद्याची उत्तम जाण असणारा अध्यक्ष सभागृहाला लाभला आहे. या बरोबरच त्यांनी राजकीय प्रश्नांचा बारकाईने अभ्यास केला आहे. त्यांनी सभागृहासमोर आलेल्या प्रश्नांवर तितक्याच ताकदीने उत्तर देऊन सभागृह उत्तम चालविले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विधानसभा सदस्य सर्वश्री जयंत पाटील ,नाना पटोले,सुरेश धस,जितेंद्र आव्हाड,नितीन राऊत, विश्वजीत कदम, रोहित पाटील यांनीही अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले.